कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्याची काही लोकांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. खासदार संजय मंडलिक यांच्यावर दबाव आणून त्यांना ओढत नेले. त्यामुळे ते आमच्याबद्दल बोलत आहेत. बाकी त्यांच्या मनात काहीही नाही, असा निर्वाळा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिला.
विरोधी पॅनेलमध्येही भाजपचे शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील,आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते.
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेत सत्तारूढ आघाडीची सत्ता येईल. शेतकऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या पीककर्जात वाढ करून एकरी ६० हजार देण्याचे नियोजन केले जाईल. कृषी कर्ज व्याज कमी करणे, मध्यम मुदत, खावटी कर्जावरील व्याजही कमी केले जाईल. दोन वर्षांत दहा हजार कोटी ठेवी करणे व २०० कोटींचा नफा करणे उद्दिष्ट आहे. चुकीचे राजकारण करतो म्हणून टीका करतात तर मग आमच्यासोबत त्यांना कशासाठी यायचे आहे हाही सवाल आहे. आता टीका करण्याऐवजी बॅंकेच्या प्रगतीची चर्चा केली पाहिजे.’’ असेही ते म्हणाले.