मुंबई:महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठी डेन्मार्कचे भारतातील राजदूत H.E. Rasmus Abildgaard Kristensen यांनी मुंबईत एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील काही खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते.

या बैठकीला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार डॉ. हेमंत सावरा आणि खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते.
भारत आणि डेन्मार्क यांच्यातील आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक मजबूत कसे करता येतील यावर चर्चा झाली. डेन्मार्कची महाराष्ट्रामध्ये आधीच मोठी गुंतवणूक आहे. भविष्यात कृषी, ऊर्जा, मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर्स आणि शिपिंग या क्षेत्रांमध्ये नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
या सर्व क्षेत्रांमध्ये डेन्मार्ककडे मोठा अनुभव आणि तज्ज्ञता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी सखोल विचारमंथन झाले.
दोन्ही देशांमधील ‘मुक्त व्यापार करार’ (FTA), गुंतवणूक वाढवणे आणि आर्थिक संबंध दृढ करण्याबतही सकारात्मक चर्चा झाली.
राजदूतांनी महाराष्ट्रातील उद्योगांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. ही बैठक महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थित खासदारांनी सांगितले.
