कागल:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेले सर्व मतभेद येत्या आठवडाभरातच संपतील आणि हे “पेल्यातील वादळ” असून ते शांत होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसह जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
मंत्री संजय शिरसाठ यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे’ या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करताना श्री. मुश्रीफ म्हणाले, शिरसाठ हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. आमच्या पक्षातील बाबींवर त्यांनी वारंवार भाष्य करणे योग्य नाही. दर मंगळवारी महायुतीमधील आम्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते. मीही त्या समन्वय समितीचा सदस्य आहे. गेल्यात मंगळवारी श्री. शिरसाठांबद्दल आपण शिंदे सेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत व दादा भुसे यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा पुन्हा त्यांनी असे वक्तव्य केले. आता येणाऱ्या समन्वय समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चांवर मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. कोणीही आमदार शरद पवार यांना भेटलेले नाहीत. भेटले असतील तर ते प्रेमापोटी भेटले असतील. पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचे केलेले कौतुक स्वागतार्ह असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, “देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा उंचावण्याचे काम पंतप्रधान श्री. मोदीजी करत आहेत, हे शरद पवारांनी मान्य केले आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी, “अनेक दिवस विलीनीकरणासाठी प्रयत्न करणारेच आता ते होणार नसल्याचे सांगत आहेत. अचानक ब्रेक का लागला, हा एक संशोधनाचा विषय आहे. याबाबत मी मुंबईला गेल्यानंतर सविस्तर माहिती घेईन, असेही ते म्हणाले
एका बाजूला राहुल गांधी व संजय राऊत पंतप्रधानांवर टीका करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार पंतप्रधानांचे कौतुक करीत आहेत. हा विरोधाभास कसा काय? या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्री. गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी श्री. मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे किंवा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. त्या टीकेबाबत त्यांनी संयम राखावा.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, रायगड-रत्नागिरी आणि परभणी-हिंगोली अशा जागांवर दावा केला असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी पक्षाची ताकद असून सर्व जागा जिंकण्याची क्षमता आमच्यात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरक्षित आहे. यापुढे कोण काय म्हणते किंवा करतय यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करू. संपूर्ण राज्यभर स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जो दबदबा होता, तो पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
समाज माध्यमांवर कॉकरोच जनता पार्टी’ ला मिळत असलेल्या भरगुत प्रतिसादाबद्दल विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, बेरोजगार तरुणांमधील नाराजीचा मुद्दा घेऊन याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत. मुख्यमंत्री तरुणाईमधील ही नाराजी आणि खदखद दूर करतील. यातून महाराष्ट्रात एखादा नवीन विजय थलपती जन्माला येईल काय? असे विचारल्यावर ते म्हणाले, आमच्या राज्यामध्ये तसे होण्याची सूतरामही शक्यता नाही. आमच्याकडे पक्षीय संघटना बळकट आहेत. दक्षिणेकडे मात्र सर्वच राज्यांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रीच्या फार मोठे प्रेम असते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर निर्णय घेतला आहे. चर्चेतून मार्ग निघेल.
पक्षामधील डॅमेज कंट्रोलसाठी काय प्रयत्न करीत आहात? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, आमच्यातील कुणीही नेता नाराज होऊ नये आणि मतभेद वाढू नयेत यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न आहेत. कारण; स्वर्गीय अजित पवार यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांचा पक्ष शेवटपर्यंत चांगल्या रीतीने कसा चालेल, यासाठीच प्रयत्न करू.
कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी काल ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल, असे जाहीर केलेली आहे. याला आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. 30 जून 2025 अखेर दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे. 30 जून 2025 अखेर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल.
आमदार शिवाजी पाटील यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ यांनी, आमदार श्री. पाटील यांनी माझी व्यक्तिगत बदनामी केली होती. आठ- दहा वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीमध्ये मी नोटा बदलल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांनी कुणाचेही ऐकून बोलण्यापेक्षा आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा फौजदारी बदनामीचा दावा दाखल करू, असा इशारा दिला. तरीसुद्धा त्यांनी टीका सुरूच ठेवली आहे. याबाबत कायदे तज्ञांशी सल्ला मसलत करू.
गोकुळ दूध संघाची कच्ची- पक्की मतदार यादी तयार झाल्यानंतर या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री निर्णय देतील आणि निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाऊ, महायुती जिंकेल आणि महायुतीचा चेअरमन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
=========
