कोल्हापूर महानगरपालिका 2026-27 चे  अंदाजपत्रक

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारीत व सन 2026-27 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 95 नुसार सादर करण्यात येत आहेत.

 

 

सन 2026-27 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह मनपा व पाणीपुरवठा महसूली अपेक्षित जमा रक्कम रुपये 754.71 कोटी असून खर्च रुपये 754.54 कोटी अपेक्षित आहे. तसेच मनपा,पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 268.17 कोटी असून खर्च रुपये 267.03 कोटी आहे. व विशेष प्रकल्पा अंतर्गत जमा रुपये 418.67 कोटी अपेक्षित असून खर्च रुपये 418.39 कोटी आहे. केंद्रीय वित्त आयोगाचे स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा रु. 55.94 कोटी अपेक्षित असून खर्च रु. 55.94 कोटी अपेक्षित आहे. याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण रु 1497.49 कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजसादर करण्यात येत आहे.

महानगरपालिकेमध्ये सुरु असलेले केंद्र/राज्य शासन निधीमधील विविध प्रकल्प व नव्याने मंजूर झालेले प्रकल्प यासाठी महानगरपालिका स्वनिधीमधून मोठया प्रमाणावर मनपा हिश्श्याची रक्कम उपलब्ध करुन द्यावी लागत आहे, याचा प्राधान्याने विचार करुन सन 2026-27 चे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात आलेले आहेत.

सन 2026-27 चे नवीन अर्थसंकल्पातील प्रमुख उद्दीष्टे –

केंद्र व राज्य शासन अनुदान सहाय्य अंतर्गत भांडवली कामाअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मनपा महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा सुविधा पुरविण्यावर भर.
सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालये दुरुस्ती, घनकचरा प्रकल्प यांची काटेकोर अंमलबजवणी.
दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजनांची काटेकोर अंमलबजावणी.
सन 2025-26 चे सुरु असलेल्या अर्थसंकल्पामधील अंमलबजावणी –

सन 2025-26 च्या मंजूर अर्थसंकल्पाचा आढावा घेतला असता पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात आल्या आहेत.

1. मनपा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांची इस्त्रो येथे अभ्यास भेट – मागील तीन वर्षापासून हा उपक्रम कोल्हापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे. राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या महानगरपालिका प्राथमिक शाळेतील 25 विद्यार्थी यांनी विमान प्रवासाने बंगळूर येथील इस्त्रो, बेंगलोर येथे विमान प्रवासाने अभ्यास भेट दिलेली आहे. सदर योजनेचा संपूर्ण खर्च हा मनपा फंडमधून करणेत आला आहे. या भेटीमध्ये इस्त्रोचे कामकाज, तेथील परिसर पाहणे, इस्त्रोचे विविध ऑपरेशन्सची लाईव्हट, विश्वेश्वरैय्या विज्ञान संग्रहायल,जैवशास्त्रीय गार्डन इ.स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे, मनपा शाळांमध्ये पटसंख्या वाढ शक्य झाली आहे. पुढील आर्थिक वर्षामध्येही विद्यार्थी इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्याबाबत नियोजन आहे.

2. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधी (N-Cap) अंतर्गत योजनांची अंमलबजावणी – महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. सन 2025-26 मध्ये प्रामुख्याने परिख पुल नजीकचा अत्यंत वर्दळीचा रस्ता या निधीमधून सिमेंट क्रॉक्रीटचा करण्यात आला आहे. याकामी रु. 2.25 कोटी इतका निधी एन-कॅप फंडमधून उपलब्ध करण्यात आला आहे.

3. घरफाळा कर व पाणी पुरवठा शुल्क दंडामध्ये सवलत योजना – सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षामध्ये सप्टेंबर/ऑक्टो.2025 या कालावधीमध्ये मिळकतधारकांसाठी थकीत घरफाळा थकबाकी एक रक्कम भरणा करणेसाठी घरफाळा दंडामध्ये सवलत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमध्ये 8480 मिळकतधारकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला व सवलत कालावधीमध्ये रु.9.37 कोटी इतकी घरफाळा वसुली झाली आहे. तसेच सप्टेंबर 2025 मध्ये थकीत पाणीपट्टी शुल्क एक रक्कम भरल्यास विलंब आकारामध्ये 90 टक्के सूट व ऑक्टो.2025 मध्ये विलंब आकारामध्ये 75 टक्के सवलत देण्यात आली. या योजनेमध्ये 19664 नळ कनेक्शन धारकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला व सवलत कालावधीमध्ये रु.3.90 कोटी इतकी पाणीपटटी वसुली झाली आहे. यामुळे घरफाळा, पाणीपट्टी शुल्कची थकीत रक्कम वसुल होण्यास मदत झाली आहे.

 

4. पायाभूत सुविधा निर्माण करणे – पायाभूत सुविधा अंतर्गत दर्जेदार रस्ते बांधणी करण्यात आले आहेत. रस्ते बांधणीमध्ये थर्ड पार्टी ऑडीट, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दर्जा तपासणी करणे याप्रमाणे कार्यवाही ठेवण्यात आली आहे. तसेच विशेष तपासणी करुन डिएलपी कालावधीमधील रस्ते पुनश्च दुरुस्त करुन घेण्यात आले आहेत. तसेच अमृत 1 पाणी पुरवठा योजना, अमृत 1 मलनिस्सारण योजनेमधील विविध उपांगे पूर्ण करुन घेण्यात आली आहेत, तसेच दुधाळी येथील 6 एमएलडी व बावडा येथील 4 एमएलडी एसटीपीचे काम पूर्ण करुन घेण्यात आले आहे. स्वच्छ भारत प्रकल्प अंतर्गत 20 टीपीडी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. परिवहन ई-बस प्रकल्प एचटी/एलटी लाईन काम पूर्ण करुन घेण्यात आले आहे व सिव्हील डेपो डेव्हलपमेंटचे काम 70 टक्के पूर्ण करुन कामास गती देण्यात आली आहे.

 

सन 2026-27 चे अर्थसंकल्पामधील उत्पन्न विषयक ठळक बाबी / प्रकल्प –

1 महानगरपालिका महसुली उत्पन्न वाढविणे – घरफाळा विभाग – सन 2026-27 साठी घरफाळा पासून रु. 110.17 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांना मिळकत कर प्रणालीमध्ये घेणे, थकीत फाळा प्रभावीपण वसुल करणेचे उददीष्ट नवीन आर्थिक वर्षामध्ये ठेवण्यात आले आहे. घरफाळा देयके वर्षाच्या सुरवातीसच देण्याबाबत नियोजन आहे, यामुळे कराचा भरणा लवकर होणे शक्य आहे. तसेच विभागाकडून मिळकत कर भरणासाठी विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत. प्रलंबित कर आकारणी, हस्तांतर प्रकरणे त्वरीत निपटारा करणेत येणार आहेत.

2 पाणी पुरवठा आकार – सन 2026-27 साठी पाणीपटटी शुल्क व सांडपाणी अधिभार पासून रु. 88.00 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. पाणी पुरवठा उत्पन्न वाढीसाठी अनाधिकृत पाणी कनेक्शन शोध घेणे तसेच स्पॉट बिलींग सिस्टीम अधिक कार्यक्षम राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कलेक्शनसाठी नागरी सुविधा केंद्रा व्यतिरिक्त युपीआय पेमेंटस्, ई-पॉस मशिनचा वापर वाढविण्यात येत आहे. पाईपलाईनवरील लिकेजीस् शोधणे, फिल्टर हाऊस येथे सौर उर्जेचा वापर करणे या बाबींची अंमलबजावणी करणेत यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्मशियल,इंडस्ट्रीयल व शासकीय नळ धारकांसाठी स्मार्ट मिटर्स बसविण्याचे नियोजन आहे, यामुळे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे.

3 नगररचना व विकास शुल्क – सन 2026-27 साठी नगररचना व विकास शुल्क पासून रु. 103.18 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. प्राप्त बांधकाम परवाना, भोगवटा व गुंठेवारी प्रकरणाचा त्वरीत निपटारा करणेसाठी विशेष कॅम्पस्चे आयोजन करण्यात येणार आहेत. ऑनलाईन बांधकाम परवाना प्रणालीचीे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील नागरिकांना सुलभ बांधकाम परवाना, भोगवटा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

4 इस्टेट विभाग – सन 2026-27 साठी इस्टेट विभाग मार्केट गाळे, होर्डींग, पार्किंग व अन्य मनपा मालमत्ता यामधून रु. 42.39 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. कोल्हापूर मनपा मालकीच्या मार्केट गाळे यांचे भाडे शासन निर्देशाप्रमाणे रेडिरेकनर पध्दतीने वसूल करण्यात येत आहे. तसेच मनपा स्थावर मालमत्ता विकसीत करणे जसे महाराणा प्रताप चौक येथे व्यापारी संकुल, शिरोली जकात नाका इमारत व अन्य जागा विकसीत करुन यामधून प्रिमियम व भाडेपोटी उत्पन्न वाढीसाठी नियोजन आहे. पार्किंग, होर्डींग, मनपा हॉलस् व व्यायामशाळा व इतर मालमत्ता यांचेमधून वाढीव उत्पन्न घेणेसाठी प्रयत्नशिल आहे.

5 म्युनिसिपल बाँन्डस,कर्ज उभारणी – नवीन आर्थिक वर्षामध्ये पायाभूत प्रकल्प जसे अमृत 2 मध्ये मलनिस्सारण योजना मध्ये 30 टक्के मनपा हिस्सा रु. 85 कोटी निधी उभा करणे आवश्यक आहे. तसेच राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधून 100 कोटीचा रस्ते प्रकल्पमध्ये 30 टक्के मनपा हिस्सा रु.30 कोटी आहे. या दोन्ही प्रकल्पामध्ये मनपा हिश्श्यासाठी महानगरपालिकेचे महसुली उत्पन्नामधून हिस्सा उपलब्ध करणे अडचणीचे आहे, यासाठी म्युनिसिपल बाँन्डस अथवा शासन सॉफट लोन द्वारे निधी उपलब्ध करावा लागणार आहे. निधीच्या आवश्यकतेप्रमाणे कायद्यातील तरतुदी व राज्य शासनाचे मान्यतेअंती कर्ज उभारणी करण्याचे नियोजन आहे.

 

सन 2026-27 चे अर्थसंकल्पामधील खर्च विषयक ठळक बाबी / प्रकल्प –

1 शहर विकास योजना –

1.1 PM e-Bus Sewa अंतर्गत 100 इलेक्ट्रक बसेस प्रकल्प – केंद्र पुरस्कृत PM e-Bus Sewa प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमास 100 ई-बसेस मंजूर आहेत. तसेच इलेक्ट्रल वर्कसाठी बीटीएम अंतर्गत एचटी लाईन व एलटी लाईन कामासाठी रु.17.95 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. एचटी लाईनचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. एलटी लाईन/चार्जिंग स्टेशनचे काम 70 टक्के पूर्ण आहे. याव्यतिरिक्त डेपो डेव्हलपमेंटसाठी रु. 17 कोटी निधी मंजूर झाला 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. अंदाजपत्रकीय वर्षामध्ये 100 ई-बसेसचा प्रकल्प कार्यान्वीत होत आहे.

1.2 एमआरडीपी प्रकल्प – महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रम (Maharashtra Resilience Development Programe) अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्हयामध्ये वारंवार उद्भवणारे पूर परिस्थितीवर मात करणेसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँक सहाय्य 70 टक्के व राज्याचा वाटा 30 टक्के असे प्रकल्पाचे स्वरुप आहे. ú कायमस्वरुपी पुरप्रतिबंधात्मक उपाययोजना करणेचा मास्टर प्लॅन व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. सदर प्रकल्प रु.524.21 कोटीचा असून प्रशासकीय मान्यतेअंती निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. सध्या प्राप्त निविदांची टेक्नीकल स्क्रुटनी करण्यात येत आहे. नवीन अंदाजपत्रकीय वर्षामये प्रत्यक्ष कामास सुरवात होत आहे.

1.3 केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणी – संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीमध्ये पाठीमागील स्टेजच्या बाजूने सुरू झालेल्या अग्नीप्रक्षोभामुळे सदरचे नाटयगृह दि.08.08.2024 रोजी अग्निच्या भक्ष्यस्थळी पडले. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकासासाठी विशेष तरतुद सन 2024-25 या योजने अंतर्गत रु.25.10 कोटी निधी मंजूर करणेत आला.

अ.क्र.

मुख्य कामाचे नाव

अंतर्भुत उप-कामे

अंदाजपत्रकीय रक्कम

(कोटी)

1.

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे टप्पा क्र.1

ग्राऊटींगचे काम, भितींचा गिलावा व छताच्या ट्रसचे व गर्डर तयार करणेचे काम, कमकुवत झालेल्या भिंती उतरुन त्या ठिकाणी नविन बांधकाम

7.35

2.

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे टप्पा क्र.2

ग्रीन रुम व अनुषंगिक स्थापत्य कामे

3.22

3.

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे टप्पा क्र.3

इंटेरिअर,ऍ़कॉस्टीक,विद्युतीकरण व अनुषंगिक कामे

11.77

4.

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे टप्पा क्र.4

स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी ऑडीओ व्हीडीओ, खुर्चा व अनुषंगीक कामे

9.20

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षि शाहू खासबाग मैदानचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी कामी उपरोक्त नमुद केलेनुसार रु.31.56 कोटीची कामे सुरु करणेत आलेली आहेत. अनुदान रु.25.50 कोटी व्यतिरिक्त उर्वरीत निधीसाठ विमा परतावा व स्वनिधीमधून तरतूद करण्यात आली आहे.

 

1.4 श्री महालक्ष्मी (करवीर निवासिनी, अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखडा – कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयाच्या प्रथम टप्प्यातील रक्कम रु.79.96 कोटीच्या कामांना दि.20.02.2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करणेत आलेली आहे. उक्त प्रशासकिय मान्यता रक्कम रु.79.96 कोटी पैकी रक्कम रू.50.70 कोटी महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. सरस्वती टॉकीज नजिक बहूमजली पार्कींग व भक्त निवास इमारत बांधणे रु.39.80 कोटी कामाचे खालील 3 टप्प्यामध्ये वर्गिकरण करणेत आलेले आहे.

1.5

अ.क्र

मुख्य कामाचे नाव

अंतर्भुत उप-कामे

अंदाजपत्रकीय रक्कम

(कोटी)

1.

सरस्वती टॉकीज नजिक बहूमजली पार्कींग इमारत बांधणे.

तळ घर, तळ मजला, पहिला मजला व दुसरा मजला

12.78

2.

सरस्वती टॉकीज नजिक बहूमजली पार्कींग व भक्त निवास इमारत बांधणे

 

तिसरा,चौथा, पाचवा, सहावा व सातवा मजला इमातीचे बांधकाम उदा.आर.सी.सी.स्ट्रक्चर व वीट बांधकाम,इ.

 

12.40

3.

सरस्वती टॉकीज नजिक बहूमजली पार्कींग व भक्त निवास इमारत बांधणे

 

तिसरा,चौथा, पाचवा, सहावा व सातवा मजला इमातीचे आतून बाहेरुन गिलावा, फरशी कामासह अनुषंगिक आवश्यक अंतर्गत कामे उदा.प्लंबींग, विद्युतीकरण, लिफ्ट, लाकडी काम, वॉटर प्रुफींग इत्यादी कामांसाठी

14.62

 

1.6 कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे – कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे कामी बी वॉर्ड, शेंडा पार्क येथील जागा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवणेत आलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची नविन प्रशासकीय इमारत उपरोक्त जागेवर उभारण्याचे प्रस्तावित करणेत आले आहे. याकामी सविस्तर आराखडा तयार करणेत आलेला आहे. सदर भुखंडाचे एकुण क्षेत्र 20234.30 चौ.मी.असून त्यावर 17314.46 चौ.मी.बांधकाम प्रस्तावित करणेत येत आहे. या आराखडयामध्ये लोकप्रतिनिधींसाठी व प्रशासकीय वापरासाठीच्या दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. हे दोन विभाग मध्यवर्ती चौकाने जोडण्यात आले आहेत. हा चौक सर्वार्थाने सामान्य नागरीकांच्या समुहाला एकत्र येण्यासाठी आरेखला आहे. भविष्यात शहराची होणारी हद्दवाढ व लोकसंख्या वाढ विचारात घेऊन लोकप्रतिनिधींसाठीच्या स्वतंत्र इमारत विभागात 150 नगरसेवकांसाठी सोय असलेने सभागृह, सर्व स्थायी व इतर समिती व सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये प्रस्तावित आहेत. प्रशासकीय इमारत – कार्यक्षम पर्यावरण पूरक, भरपूर प्रकाशयुक्त, हवेशीर, अशी आरेखली आहे. वरील सर्व सुविधांसह प्रशस्त मुख्य प्रशासकीय इमारत शेंडा पार्क येथील रि.स.नं.606/2 या ठिकाणी बांधणेसाठी रक्कम रु.103.15 कोटी निधीची अवश्यकता आहे. याकामी अनुदानासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. प्राथमिक कामांसाठी मनपा अंदाजपत्रकामध्ये रु.2 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

1.7 सानेगुरूजी वसाहत राजोपाध्ये नगर येथे अद्यावत फिश मार्केट उभारणे – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत अद्यावत फिश मार्केट उभारणी प्रस्तावीत आहे. याकामी प्रकल्प किंमत रु.50.65 कोटी आहे. सदर कामाकरीता अस्तित्वातील भाजी मंडईच्या बांधकामाचा वापर करून त्या विदयमान मिळकती वरती 4 मजले प्रस्तावित करणेत आले असून एकुण 8300 चौ.मी. चे बांधकाम क्षेत्र प्रस्तावित केले आहे. फिश मार्केटमध्ये येणारे ग्राहक, विक्रेते यांचेकरीता 42 कार पार्कींग व टु व्हिलर दुचाकी वाहनांचे पार्कींग, फिश मार्केट कॉन्फरंस हॉल, ऑक्शन हॉल, दोन लिप्ट, प्रशासकीय कामकाजाकरीता तीन कार्यालये, ऑरगॅनिक वेस्ट प्लांट, ट्रिमेंट प्लांट, सोलर सुविधा तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रस्तावित करणेत आलेली आहेत.

1.8 महानगरपालिका निधीमधून रस्ते – महानगरपालिका स्वनिधीमधून नवीन रस्ते बांधणे, गॅस पाईपलाईन खुदाई पॅचवर्क, रस्ते पॅचवर्कसाठी महसुली/भांडवली कामासाठी रु. 24.50 कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यस्तरीत नगरोत्थान योजना रस्ते प्रकल्प 100.30 कोटी मधील रस्त्यांची अपुरी कामे प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडून नव्याने रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करुन घेणेसाठी प्रयत्नशील आहोत.

1.9 शहरामध्ये वाहने पार्किंग सुविधा उपलब्ध करणे – शहरामध्ये मोठया प्रमाणावर येणारे पर्यटक यांचा विचार होऊन सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंग कार्यान्वीत करण्यात आले आहे. या पार्किंगमध्ये 250 चारचाकी वाहनांचे पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बिंदू चौक, रंकाळा नजीक पार्किंग सुरळीत करण्यात आले आहेत. गोकुळ हॉटेलनजीक मल्टीलेव्हल मेकॅनिकल पर्किंगचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच व्हीनस टॉकीज गाडी अड्डा येथे पाकिर्ंग विकसीत करण्यात येत आहे.

 

 

 

 

2 पाणी पुरवठा व मलनि:स्सारण विभाग –

2.1 अमृत 2.0 मलनि:स्सारण व तलाव संवर्धन योजना – केंद्र/राज्य शासन सहाय्य अमृत 2.0 योजने अंतर्गत कोल्हापूर शहराच्या उर्वरीत संर्पूण विस्तारीत भागात ड्रेनेज लाईन टाकणे च्या कामांस प्रत्यक्ष सुरवात झाली आहे.

नाला झोन

प्रकल्प किंमत कोटी

समाविष्ठ कामे

· जयंती

रु. 51.13

9 द.ल.लि.एस.टी.पी., 37 कि.मी. ड्रेनेज लाईन, 1 पंपिंग स्टेशन.

· दुधाळी

रु. 57.32

एकूण 19.50 द.ल.लि. एस.टी.पी., 13 कि.मी. ड्रेनेज लाईन, 3 पंपिंग स्टेशन

· लाईन बाजार

रु. 31.96

एकूण 26 कि.मी. ड्रेनेज लाईन, 1 पंपिंग स्टेशन

· बापट कॅम्प

रु.139.21

एकूण 50.76 कि.मी. ड्रेनेज लाईन, 3 पंपिंग स्टेशन, 15 द.ल.लि. एस.टी.पी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमृत-2.0 मधील मलनिस:रण योजनांची किंमत 279.70 कोटी होते. अमृत योजनेच्या आकृतीबंधानुसार केंद्र शासनाकडून 33.33% राज्य शासनाकडून 36.67% व उर्वरित 30% हे महानगरपालिकेस स्वनिधीतून उभे करावे लागणार आहेत. सदरची सर्व कामे अंदाजपत्रकीय वर्षामध्ये पूर्ण करुन घेण्यात येत आहेत.

 

2.2 शासकीय, वाणिज्य व औद्योगिक वापर पाणी कनेक्शन स्मार्ट मिटर्स बसविणे – शहरातील घरगुती कनेक्शन वगळता शासकीय, वाणिज्य व औद्योगिक वापरातील पाणी कनेक्शनसाठी स्मार्ट मिटर्स बसविणेबाबत प्रस्तावीत आहे. शासकीय, औद्योगिक व व्यापारी कनेक्शनधारक यांचेसाठी पाणी रिडींगसाठी स्मार्ट मिटर्स बसविल्यामुळे पाणी बिलींग वसुली व्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन उत्पन्न वाढ होणार आहे. पाणी बिलींगमधील गळती शोधणेस मदत होणार आहे. अमृत प्रोत्साहन निधीमधून याकामी रु.25 लाख तरतूद करण्यात आली आहे.

 

3 शहर पर्यटन वाढीसाठी सोईसुविधा – दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे एक महत्वाचे एैतिहासिक शहर आहे. शहरास मोठया प्रमाणावर पर्यटक दरवषीर् भेट देत असतात. शहरातील पर्यटन स्थळांचा सुनियोजित विकास व्हावा यादृष्टीने महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी करणे कामी पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक,पार्किंग पट्टे यासाठी नवीन अंदाजपत्रकामध्ये रु.1 कोटी तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त लग्झरी बसेस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कावळा नाका पाण्याचे टाकी नजीक लग्झरी बसेससाठी जागा विकसीत करण्यात आली आहे.

 

4 सामाजिक सुविधांचा विकास –

4.1 राजर्षि छ.शाहू समाधी स्थळ विकसीत करणे – याकामी सामाजिक न्याय विभागाकडून रु.9.40 कोटी निधी प्राप्त आहे. या परिसरातील उर्वरीत कामे राजर्षि छ.शाहू महाराज कला दालन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, या परिसरातील एैतिहासिक वास्तुंचे संवर्धन, लँडस्केपींग या कामांचा समावेश आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे, काम पूर्ण करुन घेण्यात येत आहे.

4.2 महानगरपालिका बागांची देखभाल – महानगरपालिकेच्या एकूण 54 बागा आहेत. तसेच नव्याने हरीत पट्टे व ओपन स्पेसीस विकसीत करण्यात आलेल्या आहेत. मनपा बागांच्या देखभाल दुरुस्ती व विकासासाठी अंदाजपत्रकामध्ये यासाठी रु.1.65 कोटी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

 

5 राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP fund) व पर्यावरण संवर्धन प्रकल्प –

5.1 स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कामे – सन 2026-27 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत नव्याने कामे हाती घेण्यात येत आहेत. याकामी केंद्रशासनाकडून रु.8.35 निधी मंजूर करण्यात आला आहे. एन-कॅप कमिटीमार्फत याकामी नियोजन केले असून रस्ते,ग्रीनिंग, क्रिमिटोरियम व पब्लीक अवेरनेस ची कामी हाती घेण्यात आली आहेत.

5.2 वृक्षारोपन मोहिम व हरित पट्टे – यापुर्वी शहरामध्ये हरित पट्टे विकसीत करणेत आले आहेत. याप्रमाणे शहरी वनीकरण अंतर्गत अर्बन डेन्स फॉरेस्टरी (Urban Forest) ठिकाणे विकसीत करणेचे प्रस्तावीत आहे. शहरातील ग्रीन कव्हर वाढविणेसाठी सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे. आरक्षीत जागा / टीडीआर माध्यमातून संपादीत जागेवर अर्बन डेन्स फॉरेस्टरी उभारणीसाठी नवीन अर्थसंकल्पामध्ये वित्त आयोग व मनपा स्वनिधी यामधून रु.3.23 कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

5.3 पर्यावरणपुरक गणेश विसर्जन इराणी खण/कदम खण – पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखणेकामी कोल्हापूर कोल्हापूर शहरामध्ये रंकाळया नजिक इराणी खण व कदम खण येथे शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमुर्तींचे विर्सजन होते. संपूर्ण शहरामध्ये घरगुती गणेश विसर्जन दिवशी कुंड ठेवण्यात येऊन मनपा यंत्रणेमार्फत सर्व विसर्जित गणेशमुर्ती इराणी खण येथे संकलीत करण्यात येतात व पर्यावरण पुरक विसर्जन करण्यात येते. तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमुर्तींचेही विसर्जन इराणी खणीमध्ये केले जात आहे. यामध्ये 2 वर्षांमध्ये एकूण साधारणत: 86000 लहानमोठया गणेशमुर्तींचे विसर्जन इराणी खण व कदम खणमध्ये करणेत आलेले आहे. पर्यावरणपुरक विसर्जनासाठी अंदाजपत्रकामध्ये रु.40 लाख तरतूद करण्यात आली आहे.

 

6. आरोग्य विभाग –

6.1 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर व पॉलि क्लिनिक – 15 वा वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेकरीता शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम करणेसाठी सदर योजना आहे. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यन्त मंजूर असलेली एकूण 28 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर व 5 पॉलिक्लिनिक कार्यान्वित करणेत आली आहेत. सदर नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरातंर्गत गर्भधारणा व प्रसूतीसेवा, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बाल्यावस्था व पौगंडावस्था आरोग्य सेवा, कुटुंबनियोजन, गर्भनिरोधक सेवा व इतर प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, आपत्कालीन आरोग्य सेवा, योग व आयुष सेवा, नेत्ररोग चिकित्सा, मौखिक व दंतचिकित्सा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, वयस्क सेवा/उपशामक काळजी अशा एकूण 13 प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविणेत येत आहेत. तसेच पॉलिक्लिनिक मार्फत विशेषज्ञांव्दारे मोफत विशेष आरोग्य सेवा पुरविणेत येत आहेत. 15 वा वित्त आयोग अंतर्गत रु. 29.14 कोटी रू.अनुदान प्राप्त झाले आहे. योजना प्रगतीप्रमाणे विविध बाबींसाठी खर्च करणेत येत आहे.

6.2 कोमनपा रुग्णालय सुधारणा – कोमनपामार्फत शहरातील नागरिकांसाठी मनपा हॉस्पीटल्स्, नागरी सुविधा केंद्रे व वॉर्ड दवाखाने, फिजिओथेरपी सेंटर्स, आयुष्मान आरोग्य मंदिर व पॉलि क्लिनिक नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आरोग्य उपकरणे/ साहित्य यासाठी अंदाजपत्रकामध्ये एकूण रु.2.15 कोटी तरतूद करण्यात आली आहे. हॉस्पीटल सुधारणा, देखभाल दुरुस्ती यासाठी भरीव तरतूद अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणेसाठी इन्वेंटरी ठेवणेत आली आहे. हॉस्पीटल्स्चा दर्जा उंचावणेसाठी विशेष तज्ञ डॉक्टर्स् केसबेसीसवर उपलब्ध करण्यात येत आहेत.

 

7. कुत्रा निर्बीजीकरण/शेल्टर,आरोग्य स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन,स्वच्छ भारत मिशन –

7.1 ऍ़निमल शेल्टर व कुत्रा निर्बिजीकरण – मा.सर्वाेच्च न्यायालयाचे SUO MOTO WRIT PETITION (civil) ग़्दृ. 5 दृढ 2015 मधील दिनांक 07/11/2025 व मा.सहा.आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांचे दि.18.11.2025 रोजीच्या निर्देशानुसार सर्व शैक्षणिक संस्था (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा), सर्व प्रकारचे दवाखाने, क्रिडासंकुले, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे, हेलीपॅड व विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणावरून भटके कुत्री शेल्टरमध्ये स्थलांतरित करणेत येणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका मार्फत जिल्हा नियोजन व विकास समिती यांचेकडून निधी मागणी करणे बाबत स्वतंत्र त्याबाबतचा प्रस्ताव शहर अभियंता कार्यालयाकडून प्रस्तावित करणेत आलेला आहे. भटक्या कुत्र्यां करिता शेल्टर उभारणेकामी कोल्हापूर महानगरपालिका स्वनिधीमधून रू. 60 लाखची तरतूद केली आहे. तसेच कोल्हापूर शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतींमधील भटके श्वान यांचे 2000 क्षमतेचे सुसज्ज शेल्टर शहरा बाहेर वस्ती नसलेल्या मौजे हलसवडे येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागेत उभारणे करिता जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) कडून निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कुत्रा निर्बिजीकरणसाठी स्वनिधीमध्ये रु.25 लाख तरतूद करण्यात आली आहे.

7.2 ऍ़स्परेशनल टॉयलेटस बांधणे – नवीन विविध सुविधायुक्त जसे वॉश रुम, हिरकणी कक्ष महिला/ पुरुष स्वच्छतागृह दिशादर्शक फलक इ सुविधा असणारे ऍ़स्परेशनल टॉयलेटस शहरामध्ये 7 ठिकाणी उभारणेत येत आहेत. ऍ़स्पेशनल टॉयलेटस ची कामे प्रगतीपथावर आहेत. नवीन अंदाजपत्रकीय वर्षामध्ये सर्व 7 ठिकाणावरील कामे पूर्ण करुन घेण्यात येत आहेत. याकामी रु.2.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

7.3 कोमनपाचे कार्यरत घनकचरा प्रकल्प – कोमनपामध्ये सध्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पुढील प्रकल्प सुरु आहे.

 

प्रकल्पाचे नांव व प्रतिदिन क्षमता

प्रकल्पाचे ठिकाण

प्रकल्पाची सध्यस्थिती

· आरडीएफ प्रकल्प 150 टन

कसबा बावडा

100 टन प्रतिदिन ने कार्यान्वीत.

· बायोगॅस प्रकल्प 30 टन

कसबा बावडा

पुर्ण क्षमतने कार्यान्वीत

· बायोगॅस प्रकल्प 20 टन

कसबा बावडा

पुर्ण क्षमतने कार्यान्वीत

· बायोगॅस प्रकल्प 5 टन

पुईखडी परिसर

पुर्ण क्षमतने कार्यान्वीत

· बायोगॅस प्रकल्प 5 टन

बापट कॅम्प

सध्या दुरुस्तीमध्ये.

· स्लरी प्लॅन्ट 20 टन

कसबा बावडा

पुर्ण क्षमतने कार्यान्वीत

· विंड्रो कंपास्ट प्रकल्प 53 टन

कसबा बावडा

30 टन क्षमतने सुरु.

· गार्डन वेस्ट कंपोस्ट प्लॅन्ट

ताराराणी गार्डन,हुतात्मा गार्डन, रंकाळा व महावीन गार्डन येथे.

कार्यान्वीत आहेत.

· बायोमेडीकल वेस्ट प्रकल्प 4.5 टन कपॅसिटी

कसबा बावडा

1.5टन प्रतिदिन ने कार्यान्वीत.

· बायोमायनिंग प्रकल्प 2.50 लाख मेट्रीक टन

कसबा बावडा

सध्या निविदा प्रक्रीया प्रस्तावीत

· झाडे / बगीचा हॉर्टीकल्चर प्रकल्प 5 टन

कसबा बावडा

कार्यान्वीत .

 

उपरोक्त प्रमाणे घनकचरा प्रकल्प कार्यान्वीत आहेत. याव्यतिरिक्त 100 टन फ्रेश वेस्ट प्रकल्प स्वच्छ भारत 2.0 मध्ये प्रस्तावीत करण्यात आला आहे.

 

8. दिव्यांग कल्याणकारी योजना – कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांना त्यांचे बँक खातेमध्ये थेट अर्थसहाय्यक लाभ, कुष्ठरोगी बांधवांना अनुदान, विवाह झालेल्या दिव्यांगांना अनुदान, मयत झालेल्या दिव्यांगांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य, दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहनात्मक भत्ता. दिव्यांग भवन अशा योजना नवीन आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात येत. यासाठी अंदाजपत्रकामध्ये रु.6 कोटी निधी आरक्षीत ठेवण्यात आला आहे.

9 महिला बालकल्याण योजना – कोल्हापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीमार्फत शहरातील महिला, मुली व बालकांकरीता शासन निर्देशानुसार विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी नवीन अंदाजपत्रकामध्ये रु.5.50 कोटीची तरतूद करण्यात आला आहे. मबाक बजेट अंतर्गत प्रामुख्याने अनाथ मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य, ऑटो रिक्षा चालविणे प्रशिक्षण, बचत गटांचे विक्री प्रदर्शन, क्रिडा साहित्य, खेळाडू महिलांना प्रोत्साहन अनुदान अशा योजना नवीन आर्थिक वर्षामध्ये प्रस्तावीत आहेत.

 

अंदाजपत्रकामधील बंधनकारक वेतन खर्चाचे प्रमाण पहाता, कर्मचाऱ्यांकडून शहारातील नागरिकांना अधिक जबाबदारीने, पारदर्शी व तत्पर सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. कालानुरुप मनपाचा नवीन आस्थापना आकृतीबंध मंजूर करुन घेण्यात आला आहे व सेवा प्रवेश नियम अंतिम करण्यात येत आहेत. नव्याने भरती करण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे प्रस्तावीत आहे.

अर्थसंकल्पातील जमा बाजूस अपेक्षित केलेले उत्पन्न हे कमाल मर्यादा विचारात घेऊन प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून मोठे भांडवली प्रकल्प हाती घेणे अडचणीचे असल्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन विशेष प्रकल्पांसाठी जादा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अंदाजपत्रकामध्ये महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोगाच्या जमा व खर्च तरतुदी, महिला बालकल्याण व दुबेरजी जमा खर्च स्वतंत्रपणे दर्शविण्यात आले आहेत.

महानगरपालिका आयुक्त म्हणून कामकाज पाहताना मा.पालकमंत्री, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, मनपाचे सर्व पदाधिकारी, सर्व मनपा सदस्य, नागरीक, माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे कायम सहकार्य लाभले आहे, यासाठी मी सर्वांचे मन:पुर्वक आभार मानते. महानगरपालिकेकडून राबविणेत येत असलेले सर्व प्रकल्प व नागरिकांना देण्यात येत असलेल्या सर्व सेवा-सुविधांची यांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहेे. सन 2025-26 चा सुधारीत व सन 2026-27 चा नवीन अर्थसंकल्प राबविताना आम्हास असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे.

सन 2025-26 चे सुधारीत व सन 2026-27 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज मा.स्थायी समितीस सादर करीत आहे, तरी सदरचे अंदाज स्वीकारुन मा.स्थायी समितीने अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करावेत.

🤙 8080365706