कोल्हापूर : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मोठ्या आकड्यांचा आणि घोषणांचा गाजावाजा असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आहे अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

राज्य सरकारने मांडलेल्या
अर्थसंकल्पावरील चर्चेत आमदार पाटील यांनी सहभाग घेत या अर्थसंकल्पातील तरतुदींची पोलखोल केली.
आमदार पाटील म्हणाले, सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा न घेता केवळ मोठमोठ्या घोषणांद्वारे विकासाचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात दाखवलेले आकडे आकर्षक वाटत असले तरी प्रत्यक्षात महसूल तूट वाढत असून राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत आहे.
महाराष्ट्र आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जात असताना राज्याचा विकासदर अपेक्षित पातळीवर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेती, रोजगार, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अपेक्षित तरतुदी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकार २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखवत असले तरी त्यासाठी ठोस आराखडा आणि दिशा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांपासून दूर असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. दररोज सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत राज्याच्या डोक्यावर २५० कोटींचं कर्ज वाढत आहे. राज्यात जन्माला येणारं प्रत्येक बाळ डोक्यावर ९३ हजार रुपयांचं कर्ज घेऊनच जन्माला येणार आहे. कमाईपेक्षा जास्त कर्ज राज्य सरकार काढत असून हे दिवाळखोरीकडे टाकलेले पाऊल असल्याचा घणाघातही आमदार पाटील यांनी केला.ठेवी विकून राज्यकारभार चालवण्याची वेळ
मोठमोठ्या घोषणांनी आणि आकड्यांच्या खेळाने राज्य चालत नाही.
कर्ज घेऊन आणि ठेवी विकून राज्यकारभार चालवण्याची वेळ ही महायुतीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे अपयश असल्याचा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
