कागल : मी माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या. महाराष्ट्रात इतिहास निर्माण असा उच्चांकी विजय घडवा, असे आवाहन वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पंचायत समिती, जिल्हा परिषद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील घेणार गहिनीनाथनगरच्या पटांगणात संपन्न झाला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावागावात विकासाचे काम, गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण व्हावं आणि जनतेच्या आशा आकांक्षा फलद्रूप व्हाव्यात या एका इच्छेने आम्ही एकत्र आलो आहोत. कुणाला एकटे पडण्यासाठी आम्ही तीन गट एकत्र आलेलो नाही. याचा बाक काढतो त्याचा बाक काढतो असे न म्हणता काम करा. नाहीतर; तुमचाच बाक निघेल. अधिकृत केलेले सोडून आमच्यावर निष्ठा असलेल्या सगळ्या उमेदवारांनी उद्या संध्याकाळी माघार घ्यावी. आमची इच्छा होती त्यांनीही आमच्यात यावे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब नेहमी सांगायचे, आता आम्हाला सोडून जाणाऱ्यांची भेट थेट स्वर्गात. आरोग्य , प्राथमिक शिक्षण आणि गावातील स्वच्छता याला प्राधान्य असले पाहिजे. वटा फाटून जाईल इतका निधी मी मिळवून देईन. आमची तिघांची ही केवळ युती नाही तर नवी रणनीती आहे. महाविकासाचा निर्धार आहे. या निवडणुकीत प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे. मनामध्ये कसलेही मतभेद, किल्मिष ठेवू नये. तुम हमे पंधरा दिन दो हम तुम्हे भरभरके देंगे, असा नारा त्यांनी दिला.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, आमची ही युती कुणाला एकटे पाडण्यासाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. कागलप्रमाणे या निवडणुकीतील सर्व उमेदवार राज्यात उच्चांकी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करुया. सोयीची राजकिय भुमिका घेणाऱ्यांचा व ज्या-त्या गटाशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेगळा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, संघर्षातून विकास आणि विधायक होणार नाही ही स्वर्गीय कै
विक्रमसिंहराजे घाटगे यांची भूमिका होती. युतीचा हा दिवस बघायला स्व. विक्रमसिंहराजे असते तर धन्य झाले असते. जनसामान्यांचा विकास करावा, माता बहिणीचे अश्रु पुसावे. दुःख, दारिद्र्य अंधश्रद्धा गरिबी दूर व्हावी यासाठी युती आहे. हसन मुश्रीफ यांची हवा आणि समरजितसिंह घाटगे यांचे नाव सगळीकडे निघाले पाहिजे, असे मताधिक्य १८ उमेदवारांना मिळाले पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे. जनतेला चांगले दिवस यावे यासाठी तिघांनी घेतलेला हा निर्णय आहे.
*धूल चेहरे पे थी……!*
मंत्री श्री मुश्रीफ प्रा. संजय मंडलिक यांच्या नावाचा उल्लेख न करता म्हणाले, आम्ही त्यांनाही युतीसाठी निमंत्रण दिले होते. परंतु; ते घडले नाही. आज जरी घडले नसले तरी ते भविष्यात घडेल अशीअपेक्षा करूया. दरम्यान; गालीम उम्रभर भुल करता रहा, धुल चेहरे पर थी लेकीन आईना साफ करता रहा, असा शेरही त्यांनी म्हंटला.
युती नव्हे नवी रणनीती……!
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, ही केवळ युती नव्हे तर ही नवी रणनीती आहे ही केवळ युती नव्हे तर तालुक्याच्या विकासाची गती आहे, हा मंत्र घेऊन आम्ही तिघे एकत्र आलो आहोत.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजीत पाटील,गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले.
यावेळी विरेंद्रसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, एम. पी. पाटील, नगराध्यक्ष सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, धनराज घाटगे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
