मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांचा शिंदे गटात  प्रवेश; ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सामील.

कोल्हापूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी आज तब्बल ४५० ते ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केल्याने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गारगोटी येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार संजय मंडलिक तसेच युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात बोलताना रोहन निर्मळ यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
“हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांच्याशी कोणतीही तडजोड न करता माझे सामाजिक व राजकीय काम यापुढेही त्याच जोमाने सुरू राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची भूमिका मी कायम ठेवणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहन निर्मळ यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला ग्रामीण भागात मोठे बळ मिळणार असल्याचे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
“रोहन निर्मळ यांचा संघटनात्मक अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि ग्रामीण भागातील पकड यामुळे पक्ष अधिक मजबूत होईल. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी हा प्रवेश निर्णायक ठरेल,” असे आबिटकर म्हणाले.
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक यांनीही रोहन निर्मळ यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “तरुण नेतृत्व पक्षात आल्याने नवचैतन्य निर्माण होते. शिवसेना ही सर्वसामान्यांची बाजू घेणारी ताकद असून रोहन यांचा सहभाग या लढ्याला नवी दिशा देईल,” असे सांगितले.
प्रवेश सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रवेश केल्याने आगामी स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गट अधिक आक्रमक भूमिकेत दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच, रोहन निर्मळ यांच्या या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

🤙 8080365706