कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनता महायुतीलाच साथ देईल. मतदारांमध्ये असलेला मोठा उत्साह पाहता, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणे निश्चित असल्याचा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शनिवार पेठ येथील पद्माराजे विद्यालय मतदान केंद्र येथे सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सपत्नीक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
सपत्नीक मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहून आपला विजय निश्चित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले कि, देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वास महायुती सोबत आहे. गेली ५ वर्षे शहरात महायुतीच्या माध्यमातून विकासाचे वारे वाहत आहे. हे मतदारांनी देखील मान्य केले आहे. त्यामुळे ६५ च्या वर जागांवर महायुतीचा विजय होईल. महापालिकेत सत्तांतर होवून विकासाच्या बाजूने म्हणजेच महायुतीला नागरिकांनी कौल दिल्याचे दिसून येईल. देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसने “गरिबी हटाव” चा नारा दिला पण गरिबी काय हटविली नाही. त्यांच्या आताच्या फसव्या टॅगलाईन लोकांच्या लक्षात आल्या असून, राज्यातील २९ महापालिकात महायुतीच भारी असल्याचे दिसेल.
कोल्हापूरचा महापौर महायुतीचे वरिष्ठ ठरवतील : आमदार क्षीरसागर
कोल्हापूरात महायुती म्हणून लढल्यासच विजय होईल असा ही भूमिका माझी पहिल्यापासून होती. महायुती घडविण्यात, जागा वाटपात एक पाऊल मागे येत महायुती घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मतदारांचा महायुतीच्या बाजूने असणारा कौल पाहता निश्चितच महापालिकेत महायुतीचा महापौर दिसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वरिष्ठ महायुतीचा महापौर ठरवतील. ज्या शिवसैनिकांना उमेदवारी देवू शकलो नाही त्यांना निश्चितच पुढच्या काळात योग्य मान सन्मान ठेवून न्याय दिला जाईल, असेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
