मुंबई:आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. गेली २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न सोडवता आला, याचे समाधान आहे.असे मत मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले.
यापूर्वी १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित करण्यात आला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ३४५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली असून, उर्वरित सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या एका महिन्याच्या आत सेवाखंड क्षमापित पत्रांचे वितरण करण्यात येईल, असे याप्रसंगी मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरली जाणार असून, त्यांना पदोन्नती, वेतनवाढ, निवृत्तीवेतन तसेच इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन २००९ पूर्वी आरोग्य विभागात अनेक वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात कार्यरत होते. सन २००९ मध्ये त्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात आला. मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना विविध लाभांपासून वंचित राहावे लागत होते. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्य सेवेत गुणात्मक सुधारणा होईल, असा मला विश्वास आहे. तसेच नक्षलग्रस्त, आदिवासी व दुर्गम डोंगरी भागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहन भत्ता (Incentive) देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
राज्यातील जनतेला अधिक चांगली, सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणे ही डॉक्टरांची मोठी जबाबदारी आहे. डॉक्टरांनी अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच डॉक्टरांच्या हक्काच्या बाबतीत शासन नेहमीच सकारात्मक असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर सचिव श्री. केंद्रे, सहसंचालक श्री. राजेंद्र भालेराव यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
