मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे. साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले. यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी किर्तन, कविता वाचन केले आणि वीर शहीद साहिबजादे यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजीत सिंग, गुरुदेव सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हॅपी सिंग, डॉ. अजयसिग राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बल मलकीत सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. शासनाच्या पुढाकाराने गुरूंच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळत असल्याचे नमूद करुन या उपक्रमासाठी बल मलकित सिंग यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रासाठी आपले शीश समर्पित करणाऱ्या गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या महान बलिदानाला देश कधीही विसरणार नाही. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या संपूर्ण परिवाराने देश, संस्कृती आणि संस्कारांसाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. गुरु तेग बहादूर यांनी शेवटपर्यंत आपले रक्षण केले असल्याने त्यांच्या इतिहास सर्वांनी कायम लक्षात ठेवावा.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. वीर बाल दिवसानिमित्त या वीर, शहीद साहिबजादांना नमन करून त्यांच्या जीवनातील दृढता, धैर्य आणि निष्ठा आपल्यातही यावी, अशी प्रार्थना आज गुरूंना करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
