कोल्हापूर :फराळे–काळम्मावाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत एकूण तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये फराळे लिंगाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र, काळम्मावाडी धरण परिसरातील पर्यटन विकास आणि दूधगंगांनगर येथील IB रेस्ट हाऊस नूतनीकरण या कामांचा समावेश आहे.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने फराळे लिंगाचीवाडी येथे ६१ लाख रुपयांचे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. दूधगंगा–काळम्मावाडी प्रकल्पामुळे पाण्याखाली गेलेले जुने आरोग्य उपकेंद्र स्थलांतरित करून हे नवे उपकेंद्र उभारले जात असून, यामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
पर्यटन विकासासाठी काळम्मावाडी धरण येथे म्हैसूर गार्डनच्या धर्तीवर भव्य गार्डन उभारण्यास ७ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच दूधगंगांनगर येथील IB रेस्ट हाऊस नूतनीकरणासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली असून, यामुळे शासकीय व प्रशासकीय सोयी अधिक सक्षम होतील.
या सर्व निर्णयांच्या अनुषंगाने परिसरातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित मान्यवर, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांशी संवाद साधताना जनतेने व्यक्त केलेला विश्वास आणि आपुलकी मनापासून भावली. अशा भावना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी शरद सहकारी सूतगिरण संचालिका वैशाली विलास डवर, फराळे माजी सरपंच पांडुरंग पाटील, उपसरपंच कृष्णात हातकर, माजी उपसरपंच शांताराम चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विष्णू राम डवर, अश्विनी विष्णू डवर, एम. डी. बाबर, प्रकाश बाबर, जयवंत पाटील, विलास डवर, के. एम. पाटील, सदाशिव केळुस्कर, दत्तात्रय पाटील, नेताजी कांबळे, प्रकाश वंजारे, प्रमोद पाटील (फराळे), सुरेश पाटील, लक्ष्मण गिरी, सखाराम गिरी, तेजस्विनी सावंत, कमल पाटील, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
