टोप:
श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पेठ वडगाव येथील बी. एड प्रशिक्षणार्थीनींनी नावीन्यपूर्ण शाळा भेट उपक्रमांतर्गत रयत पब्लिक स्कूल, कुंभोज येथे अभ्यासात्मक भेट दिली.
भेटीची सुरुवात कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मीबाई वहिणी यांना अभिवादन करून झाली. यानंतर माननीय मुख्याध्यापक सागर माने यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याचा आढावा देणारी माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी फिल्म प्रशिक्षणार्थींना दाखवली. तसेच वस्तू संग्रहालयातील प्रत्येक छायाचित्र, ऐतिहासिक दस्तऐवज आणि कर्मवीर अण्णांचे कार्य याबाबत सखोल माहिती मुख्याध्यापक माने यांनी दिली.
यानंतर प्रशिक्षणार्थीनींना शाळा प्रणालीची माहिती गटचर्चेद्वारे करून देण्यात आली. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांच्या भूमिका आणि कार्यपद्धती मुलाखतींच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या. शाळेचा परिसर, भौतिक सुविधा, क्रीडांगण, स्मार्ट क्लासेस यांचीही पाहणी करण्यात आली.
कार्यक्रमात प्रास्ताविक व स्वागत प्रा. बाणदार सुनिता यांनी केले. प्रा. कोळी विमल यांनी मनोगत व्यक्त केले. सुजाता पाटील, संजीवनी जाधव आणि सुनिता शिंगारे यांनी शाळाभेटीतील अनुभव कथन केले. धनश्री शेळके हिने आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या अस्मिता पाटील तसेच गुलाबराव पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास बी. एडच्या सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
