महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोडवर काम करुया: मंत्री प्रकाश आबिटकर 

नागपूर: महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर  यांनी बैठकीत केले. सिकलसेलचे रुग्ण ‘शून्यावर’ आणण्यासाठी सर्वप्रथम अचूक तपासणी आणि रुग्णांची योग्य नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक तपासणी वेळेत पूर्ण व्हावी, नवीन निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ ओळखपत्र दिले जावे आणि एकही रुग्ण नोंदणीविना राहू नये आणि मुख्य म्हणजे या कामात निष्काळजीपणा करू नका, असेही स्पष्ट केले.

नागपूर येथील आरोग्य सेवा कार्यालयात घेतलेल्या बैठकीत राज्यातील सिकलसेल नियंत्रणाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. येणाऱ्या काळात गडचिरोली, नंदुरबार, पालघर आणि मेळघाट यांसारख्या आदिवासीबहुल भागांतील परिस्थितीवर अधिकाऱ्यांमार्फत विशेष भर दिला जाईल.

सर्व ग्रामीण रुग्णालयांत शासनाची स्वतःची सिकलसेल तपासणी यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार असून खाजगी संस्थांवर अवलंबून न राहता आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, ब्लड स्टोरेज आणि औषधसाठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यास रोटेशन पद्धतीने इतर भागातील तज्ज्ञांची नियुक्ती देखील केली जाईल.

आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत १४०० ते १५०० पदभरती लवकरच करण्यात येणार आहे. बाह्य संस्थांमार्फत भरती करण्याची आवश्यकता भासल्यास ती एजन्सीद्वारे न करता ११ महिन्यांच्या सेवा करारावर थेट कंत्राटी पद्धतीने करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.

आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असून विभाग आपली क्षमता पूर्णपणे वापरेल. आशा सेविकांना दररोज २५ आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना १० गृहभेटींची जबाबदारी दिली असून तिची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास रुग्ण निदानाची गती वाढेल तसेच जबाबदारी टाळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.

१००% संस्थात्मक प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे. तसेच धारणी आणि नंदुरबार येथील अपुऱ्या औषधसाठ्यासाठी दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल. आरोग्य यंत्रणेने नागरिकांसाठी जबाबदारीने काम केलेच पाहिजे हा आग्रह मंत्री आबिटकर यांनी बोलून दाखवला.

बैठकीत आमदारांनी आदिवासी व दुर्गम भागातील मनुष्यबळ, औषधसाठा आणि संशोधनाधारित उपचारांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सर्व लोकमताचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी एकत्रित, वेळबद्ध आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार  केवलराम काळे, आमदार आमश्या पाडवी, जिल्हास्तरीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706