कुंभोज (प्रतिनिधी) :- कुंभोज परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेत आणि शांततेत पार पाडल्याने गावात शांतता आणि शिस्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले.गणेशोत्सवाचा उत्साह भरगच्च वातावरणात साजरा झाल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून विविध मंडळांनी आपले बाप्पा मिरवणुकीस काढले. ढोल-ताशांच्या गजरात, भजन मंडळांच्या साथीने आणि भक्तिभावाने मंडळांनी विसर्जन मिरवणुका सुरु केल्या. स्थानिक पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली.
ग्रामपंचायतीने विसर्जन घाटांवर स्वच्छतेची व सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली होती. युवावर्ग व स्वयंसेवकांनी विसर्जन स्थळी पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन व्हावे यासाठी जनजागृती केली.
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या वतीने योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी काही रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू न देता सर्व विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडले.
यंदा अनेक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक विसर्जन केले. काही मंडळांनी कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जन करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कुंभोज येथील जवळजवळ 40 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सलग सुरू असल्याने गावात एक यात्रेची स्वरूप आले होते यावेळी जनस्वराज्य पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या वतीने सर्व मंडळांचे स्वागत करण्यात आले.विनोद शिंगे कुंभोज