शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेअंतर्गत ७५० गोणी प्लास्टीक व अन्य कचरा संकलन करण्यात आले. महाराष्ट्राचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले.

             

 

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दि. ४ जून ते ८ जून २०२५ या कालावधीत १५० स्वयंसेवकांसह रायगड परिक्रमेसह शिवराजधानी किल्ले रायगडची स्वच्छता मोहीम पार पाडण्यात आली. या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी इतिहास अभ्यासक प्रा. भिकाजी लाड यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना राजधानी रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य याविषयी सप्रमाण माहिती सादर केली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या यशस्वी मोहिमांबद्दल आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण रायगडची स्वच्छता केली. स्वच्छतेमध्ये ४५० गोणी प्लास्टिक संकलन व इतर कचरा संकलन त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाबाबत घोषणा आणि फलकांद्वारे जनजागृती केली.

७ जून २०२५ रोजी पुन्हा रायगडावर निर्माण झालेला कचरा तसेच प्लास्टिक संकलित करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ ते जगदीशश्वर मंदिर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ परिसर, राजसदर परिसर, बाजारपेठ परिसर तसेच रोपवेपर्यंतच्या रस्त्यावरील साफसफाई आणि महादरवाजा ते चित्त दरवाजा या गडउतार होण्याच्या पायी मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये सुमारे ३०० बॅग प्लास्टिक स्वयंसेवकांनी संकलित केले. याबरोबरच स्वयंसेवकांनी रायगडावर राज्याभिषेक दिनी मोफत अन्नछत्र दिलेल्या समितीचे सर्व साहित्य गडापासून रोपवेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या नेतृत्वाखाली एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. आर. माळी, डॉ गोरखनाथ किर्दत, डॉ. सचिन चव्हाण डॉ. के एस शिंदे, डॉ. कमलसिंह क्षत्रिय, डॉ. संदीप पाटील व प्रा. अजय दळवी, प्रा. मल्लिकार्जुन भैरगोंड यांनी शिबिराचे संयोजन केले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मोहिमेसाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांनीही शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले.

🤙 9921334545