कोल्हापूर : जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभारी प्रशासक अमोल येडगे यांनी आज संबंधित सर्व अधिका-यांना दिल्या. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पावसाने उघडीप दिल्यावर चार ते पाच दिवसात उर्वरीत नालेसफाई व गाळ उठावाची कामे गतीने पूर्ण करा. नदीपात्रातील बांधकामांचे सर्वेक्षण करा. रस्त्याच्या कडेला साचलेला राडारोडा काढून घ्या. जूनच्या पहिल्या पावसात शहर परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्या. पूराच्या कालावधीत नागरिकांनी सतर्क रहावे, यासाठी जनजागृतीवर भर द्या. पुराचे पाणी साचणाऱ्या मार्गावरील सर्व गटारे, नाले साफसफाई करण्याला प्राधान्य द्या. पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्रांची पाहणी करुन याठिकाणी पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा, जेवणाचे योग्य नियेाजन करा. पूरपरिस्थितीत पाणीपुरवठा खंडीत झाल्यास टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन करा. पावसाळयात वाहतूक समस्या वाढत असल्याने अशा मार्गावरील अतिक्रमणे तात्काळ हटवा. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करुन त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करा. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे दुरुस्तीची कामे तात्काळ करा. नदी पात्रातील बांधकामांचे सर्वेक्षण करुन रस्त्यावरील अडथळे व धोकादायक पध्दतीची बांधकामे काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहराच्या प्रवेश द्वारावरील गावांच्या सीमेवरील कचरा उचलण्यासाठी महापालिका व ग्रामपंचायतीने समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या.
नागरिकांचे स्थलांतर, पाणीपुरवठा, वाहतूक व आरोग्य सुविधेकडे लक्ष द्या – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
शहर परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून राहू नये, यासाठी नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे. पावसाने उघडीप दिल्यावर नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढून घ्या. या कामासाठी महापालिकेची साधन सामुग्री अपुरी पडल्यास भाडे तत्वावर साधनसामुग्री घ्या. पाईपलाईन मधील लिकेज वेळेत शोधण्यासाठी व शहरातील नागरिकांना कायमस्वरुपी समप्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी स्काडा सिस्टिम बसविण्याबाबत विचार करा. पूर परिस्थिती उद्भवली तरी लिकेज व इतर अडचणीमुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, याची खबरदारी घ्या. शहरात सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्या. यासाठी टँकर व अन्य पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करा, गरज भासल्यास ठोक मानधन तत्वावर कर्मचारी घ्या. धोकादायक इमारतीतील नागरीकांचे वेळेत स्थलांतर करा. अतिक्रमण झालेल्या इमारती हटवताना नियमानुसारच कारवाई करा, यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या. यासाठी आवश्यक तो औषधसाठा करुन ठेवा. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. धोकादायक पोल, होर्डींग्जबाबत योग्य ती दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व संबंधित विभाग प्रमुखांनी पूर परिस्थितीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.