कोल्हापूर (विनोद शिंगे)
लक्ष्मीपुरी बाजारपेठ येथील परमाळे सायकल कंपनीच्या समोरील परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यात अडकला आहे. दोनच महिन्यापूर्वी कोल्हापुरातील समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने समस्येबाबत महापालिका आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आणि एक निवेदन सादर करून त्यांचे लक्ष वेधले होते. या निवेदनाची दखल घेऊन येथील परिसर स्वच्छ करण्यात आला होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात पुन्हा येथील परिसर घाणीच्या साम्राज्यांनी वेढलेला असून त्यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या आजारांना आयते निमंत्रण मिळणार आहे. त्यामुळे येथील परिसर पुन्हा स्वच्छ करावा तसेच येथे घाणिचे साम्राज्य निर्माण करण्यास हातभार लावणाऱ्या घटकांवर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे यांनी केली आहे.
लक्ष्मीपुरी बाजारपेठ हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि व्यापारी पेठ असल्यामुळे देखील येथे ग्राहकांची रेलचेल सुरू असते. मागील दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मीपुरी बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर अर्थात परमाळे सायकल कंपनी समोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. ड्रेनेजचे सांडपाणी येऊन रस्त्यावर पसरले होते. त्यात भर म्हणून स्थानिक काही फळे, भाजी व्यापारी देखील आपला कचरा तेथे टाकत होते. त्यामुळे या परिसराला गलिच्छतेचे रूप आले होते. या प्रश्ननी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच या विषयाचे गांभीर्य कळावे, यासाठी या परिसराचे छायाचित्र देखील निवेदनासोबत जोडले होते. त्यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबत योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिले होतें. त्यानंतर काही दिवसांनी येथील समस्या मार्गी लावली होती. अर्थात, येथील परिसर स्वच्छ आणि सुंदर केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा होती तशीच परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. येथे सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात भरीस भर म्हणून काही बेजबाबदार फळ विक्रेते आपला कचरा या घाणीत टाकून जात आहेत. परिणामी येथील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर दर्शन साठी येणाऱ्या पर्यटकानही याचे दर्शन घडू लागले आहे.ही कोल्हापूर शहरासाठी भूषणावह बाब मुळीच नाही. त्यामुळे बरेच दिवस एकाच ठिकाणी सांडपाणी साचून राहिल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका सभवत आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तातडीने या परिसराची स्वच्छता करावी, आणि ही परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था करत आहेत.विनोद शिंगे कुंभोज