साहित्य हेच आत्म्याचं खरे प्रतिबिंब – हिंदी साहित्यकार गोपाल शर्मा

 कोल्हापूर : “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती झालेली असली तरी, आज कोणतंही यंत्र माणसाच्या मनाचा थांग लावू शकलेलं नाही. मानवी संवेदनशीलता, विचार, भावना आणि आत्म्याची ओळख हे फक्त साहित्यच करून देऊ शकतं, म्हणून साहित्य हेच आत्म्याचं खरे प्रतिबिंब आहे.” असे स्पष्ट मत गुजरात व राजस्थान साहित्य अकादमी द्वारा पुरस्कृत, हिंदीचे जेष्ठ साहित्यकार गोपाल शर्मा ‘सहर’ यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सहर म्हणाले : “लेखन करणे हे केवळ शब्दांची मांडणी नसून ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. लेखकाचं लेखन कमी असलं तरी त्यात अदभूत विचारमंथन असले पाहिजे. कोणतीही रचना शंभर वर्षं टिकावी, एवढं तिचं मूल्य असावं.” सहर यांनी साहित्याच्या दूरगामी परिणामांवर, लेखकाच्या जबाबदारीवर आणि कालातीत लेखनाच्या आवश्यकता यावर भर दिला. यावेळी मराठीचे प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. बाळासाहेब लबडे (रत्नागिरी) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मुंज यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गीता दोडमणी यांनी केले. कार्यक्रमास डॉ. अक्षय भोसले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुवर्णा गावडे, संशोधक सतीश हरपडे, आनंद बेडगे, हणमंत कांबळे, अजय कांबळे, जानकी देसाई, प्रमोद कांबळे, अनिकेत माने यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते.

🤙 9921334545