मुंबई : क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केली आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली. अलिकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. रोहितच्या निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर, विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटला निरोप दिला.
विराट कोहली शेवटच्या संदेशात काय म्हणाला?
कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ (भारताची टोपी) प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.
या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन!
#269, साइनिंग ऑफ.