सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याचे पूजन केल्यानंतर येथे गोवर्धन गोशाळेचे उदघाटन होत आहे. खा. नारायण राणे यांनी गोवर्धन गोशाळेचा अतिशय सुंदर प्रकल्प उभा केला आहे. कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर ते अचूक आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, अशी त्यांची कार्यपद्धती असते. गोवर्धन गोशाळेचा प्रकल्पदेखील अतिशय उत्तम आहे. गोवर्धन गोशाळा अनुसंधान केंद्रदेखील आहे. गोधनाद्वारे अर्थव्यवस्था तयार होऊ शकते, याचा वस्तुपाठ येथे निर्माण करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपला सनातन धर्म, सनातन संस्कृती केवळ मूर्तीपूजक नसून निसर्गपूजक आहे. यामध्ये गोमातेला अतिशय उच्च दर्जा दिलेला आहे. गोमातेला आपण आईसारखे मानतो, गोमातेत ईश्वर वास करतो, असे मानतो. कारण कृषि संस्कृतीत गोमातेला दुसरा कुठलाही पर्याय नाही. गोमातेचे महत्त्व जाणून घेतल्यानेच आपली शेती समृद्ध होती. गोमाता जन्मापासून मृत्युपर्यंत केवळ देत राहते. गोमाता देणारी आहे, घेणारी नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे काही काळ उत्पादकता वाढली पण शेवटी जमिनीचा पोत खराब होऊ लागला, उत्पादकता कमी झाली. त्यातूनच नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल, असे लक्षात आले. विशेषतः शेतीत देशी गायीच्या शेणाचा वापर केल्यास उत्पादकता दीडपटीने, दोन पटीने वाढू लागली. म्हणूनच नैसर्गिक शेतीचे मिशन सुरु केले असून यामध्ये 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे ठरवण्यात आले. ती शेती गोमातेच्या संवर्धनाशिवाय करता येणार नाही. म्हणून गोमातेचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर करत आहोत. राज्य शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. देशी गोमातेला चाऱ्यासाठीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याकडील देशी गायी चांगल्या होत्या. पण आपण विदेशी गायी आणल्या, त्यांच्यापासून संकरित जाती तयार केल्या. पण, आपल्या गीर, थारपारकर, साहिवाल गायींचे ब्राझीलने संवर्धन केले. गोवर्धन गोशाळा येथे सर्वच देशी गायी पाहायला मिळाल्या. देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला व शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो. शेणावर आधारित खते, गॅस, रंग तयार होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील घरात शेणापासून तयार केलेल्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. आम्हीही आमच्या विभागांमध्ये शेणाचा रंग वापरला पाहिजे. यासाठी आपण जास्तीतजास्त इन्सेन्टिव्ह देणार आहोत. कसायाकडे जाऊ शकणाऱ्या गायीदेखील येथे जिवंत राहणार आहेत. म्हणून हा अतिशय चांगला प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.