अंधार पसरणार, सायरन वाजणार; उद्या देशभरात मॉक ड्रिल

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी, उच्चस्तरीय बैठकांचं सत्र पाहता भारताकडून पाकिस्तानवर कधीही हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर मिळू शकतं. ही शक्यता लक्षात घेता उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलेल्या आहेत.

७ मे रोजी देशभरात २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. याची विभागणी ३ श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येईल. आपत्कालीन परिस्थिती नागरिकांनी नेमकं काय करावं याचं प्रशिक्षण मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिलं जाईल. युद्धजन्य परिस्थितीत हवाई हल्ला झाल्यास सुरक्षेचे उपाय, आपत्कालीन स्थितीत घ्यायची दक्षता यांची माहिती मॉक ड्रिलमधून दिली जाते.

राज्यातील एकूण १६ ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे. मॉक ड्रिलसाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांची विभागणी ३ श्रेणींमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या श्रेणीत देशभरातील १३ शहरं आहेत. मुंबई, उरण, तारापूर यांचा समावेश पहिल्या श्रेणीत करण्यात आलेला आहे. दुसऱ्या श्रेणीत देशभरातील तब्बल २०१ ठिकाणं आहेत. यामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धताव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे. तिसऱ्या श्रेणीत औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

नागरिकांनी काय करायचं? काय टाळायचं?
१. मॉक ड्रिलदरम्यान हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजू शकतात. हा केवळ अभ्यास आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. सायरनचा आवाज ऐकून शांत राहावं आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं.

२. सायरन वाजताच तातडीनं मोकळ्या भागातून बाजूला जावं. कोणत्याही सुरक्षित इमारतीत, बंकरमध्ये आश्रय घ्यावा. तुम्ही बाहेर असल्यास जवळच्या इमारतीत जा. सायरन वाजल्यानंतर ५ ते १० मिनिटांत सुरक्षित ठिकाणी पोहोचा. आसपास बंकर उपलब्ध असल्यास तिथे जा.

३. मॉक ड्रिलवेळी क्रॅश ब्लॅक आऊटचा अभ्यास होईल. त्यावेळी सगळे दिवे बंद केले जातील. त्यामुळे शत्रूराष्ट्राला नागरी भागाला लक्ष्य करणं अवघड जाईल. तुमच्या घराच्या खिडक्या, तावदानं, दरवाजे काळ्या कपड्यांनी झाका. प्रकाश घराबाहेर जाऊ देऊ नका. रस्त्यावर वाहनं चालवत असताना लाईट बंद करा. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करा.

४. मॉक ड्रिल दरम्यान नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षेचं प्रशिक्षण दिलं जाईल. हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या पद्धती शिकवल्या जातील. प्रशिक्षणात सहभाग घ्या आणि आपत्कालीन स्थितीत काय करायचं, याची माहिती जाणून घ्या.

५. मॉक ड्रिलमध्ये एमर्जन्सी एक्झिटचा अभ्यास होईल. त्यात लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येईल. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. सुरक्षित ठिकाणी जाताना शांत राहा. जवळच्या सुरक्षित ठिकाणाबद्दल तुमच्या कुटुंबाशी आधीच चर्चा करुन ठेवा.

६. टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्टकडे लक्ष ठेवा. मॉक ड्रिलच्या दरम्यान प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या जातात. अशा परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या.

७. मॉक ड्रिल दरम्यान आपत्कालीन किटचा उपयोग समजून सांगितला जाऊ शकतो. त्यात पाणी, प्रथमोपचार, टॉर्च, बॅटरी, महत्त्वपूर्ण कागदपत्रांची कॉपी, अतिरिक्त कपडे आणि पांघरुण यांचा समावेश असायला हवा. हे किट सहजपणे उपलब्ध होईल, याची काळजी घ्या.

८. स्थानिक प्रशासन, नागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक आणि पोलिसांना सहकार्य करा. जर तुम्ही नागरी संरक्षण दल किंवा होम गार्डशी संबंधित असाल, तर तुमची जबाबदारी समजून घ्या आणि इतरांना मदत करा. शेजाऱ्यांशी, आसपासच्या परिसरातील लोकांशी समन्वय राखा. जेणेकरुण सगळे सुरक्षित राहतील.

९. मुलांना ड्रिलची त्रोटक माहिती देऊन ठेवा. त्यामुळे ते ड्रिलच्या दरम्यान घाबरणार नाहीत. त्यांना सायरन आणि ब्लॅकआऊट प्रक्रियेबद्दल सांगा. वृद्धांना, दिव्यांगांना मदत करा. जेणेकरुन ते सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतील.

१०. सोशल मिडिया आणि अन्य स्रोतांमधून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. केवळ सरकारी वृत्तवाहिन्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.

🤙 8080365706