कोल्हापूर : दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या,सर्वसुविधायुक्त इमारतीच्या पायाखुदाई समारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री मा.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या नव्या ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी एकूण १६ कोटी १५ लाखांचा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून,एकूण ७२ गुंठ्यांवर ही अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे.सध्या ३० खाटांचे असलेले रुग्णालय आता ५० खाटांचे होणार असून,त्यात स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड,दोन ऑपरेशन थिएटर,कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे,दंत,नेत्र,बालरोग विभाग यांचा समावेश असेल.
सर्व प्रकारच्या सर्जरीसाठी सुविधा उपलब्ध असणार असून,गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था राहणार आहे.पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) व एमएलसी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना व RBSK योजनांचा लाभ,तसेच आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत.इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचा तात्पुरता स्थलांतरित उपविभाग सुरू करण्यात आले असून,त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
या इमारत बांधकामाच्या पायाखुदाई सोहळ्यामुळे दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती येणार असून सदरची इमारत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.या रुग्णालयाच्या माध्यमातून दत्तवाडसह परिसरातील रुग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.