छत्रपती संभाजीनगर शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट यंत्रप्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य कर्करोग संस्थेच्या इतिहासात आजचा हा दिवस महत्वाचा आहे. कर्करोग रुग्णांसाठी 2012 मध्ये 100 बेडवर सुरू झालेला कर्करोग रुग्णालयाचा 300 बेडपर्यंत विस्तार झाला आहे. राज्यात जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी या सुविधा निश्चितपणे वरदान ठरतील. या संस्थेला एम्सचा दर्जा देण्याची विनंती करण्यात आली. .
राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्ण येतात. त्यांना दर्जेदार सेवा देणे शासनाचे कर्तव्य आहे. येत्या दोन वर्षात जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. जेणेकरुन खाजगी रुग्णालयात रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही. अशी व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनाकडून काम सुरू असल्याचे सांगितले.
कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा यांनी कर्करोग व उपचार व्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी भारतीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय प्रयोगशाळेबाबतचे विधेयक संमत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. सांदिपान भुमरे, मंत्री हसन मुश्रीफ आ. सतिष चव्हाण, आ.संजय केणेकर, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.