पुणे : येथील राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमाराचा भूमिपुजन समारंभ व हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नवीन 43 दवाखान्यांचे लोकार्पण समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.
आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालय आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार असल्याचे मत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
राज्यात एकत्रितरित्या ४३ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उदघाटन झाले असून आपल्या आरोग्य व्यवस्थेतील हे एक मोठे पाऊल आहे.
यामध्ये पुणे शहरात ७, अकोला शहरात १, अमरावती शहरात ५, कोल्हापूर शहरात २, सोलापूर शहरात १०, नाशिक शहरात ४ आणि ठाणे शहरात १४ ठिकाणी आजपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सुरुवात झाली आहे.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.