कोरेगाव :तालुक्यातील पिंपोडे बु. येथे आयोजित भव्य नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपुलकीनं केलेला सत्कार स्वीकारत अन्य सत्कारानं सन्मानित सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन केलं आणि उपस्थित नागरिकांना व शेतकरी बांधवांना संबोधित केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले,सध्या स्थितीला देशात आणि राज्यात ज्या समस्या आहेत, त्या सोडवायच्या असतील तर, तुमचं-आमचं हक्काचं सरकार त्या अडचणींतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे. मग तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो. बारामतीप्रमाणेच सातारा जिल्ह्यासाठी विकासाभिमुख कामं करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याचं काम आम्ही केलं. नव्या पिढीला सैनिकी शाळेत चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्या शाळेशी संबंधित रखडलेली कामं मार्गी लावली. कोयनानगरमध्ये स्कायवॉक आणि नेहरू उद्यानाच्या सुशोभीकरणाचं काम आम्ही केलं.
यंदा मी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना तसंच तीन, पाच व साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज यांसारख्या योजनांसाठी आम्ही भरीव तरतूद केली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांच्या सहकार्यानं राज्यात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग उभारण्याची कामं आम्ही हाती घेतली आहेत. नवीन रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम देखील हाती घेण्यात आलं आहे. फलटण ते बारामती मार्गाचं काम देखील प्रगतीपथावर आहे. मेट्रोची कामं सुद्धा जलद गतीनं सुरू आहेत.
जगातली गुंतवणूक, देशातील गुंतवणूक, राज्यातली गुंतवणूक वाढावी याकरिता शक्य तिथे राज्यात विमानतळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्योग, रोजगार आदींशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होईल. क्षेत्र कोणतंही असो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता त्यात तुम्हाला आमची गरज भासेल, तिथे आम्ही राज्य सरकार म्हणून तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या आदर्श विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत आहे. जनकल्याणाच्या कार्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
