मुंबई :
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने देखील या निर्णयाचा विरोध केला आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हिंदीची जबरदस्ती कशासाठी? आणि हिंदी भाषेबाबत केलेल्या कायद्यावर भाष्य केलं आहे.
दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत असतो. जगभरात ज्या भाषांमध्ये जास्त प्रमाणात संवाद साधला जातो; त्यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश होत असतो. मात्र, हिंदी भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये असाही एक गैरसमज आहे की, हिंदी भाषेचा वापर भारतामध्ये अधिक प्रमाणात होत असल्याने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मात्र, वास्तवात तसे नाही. अधिकृतपणे हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामागील कारणांचा घेतलेला हा धांडोळा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.