कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मंडी येथील आयआयटीशी करार

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करण्यासाठी आता हिमाचल प्रदेशातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान संस्थेसोबत शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे यासाठी कोल्हापूरचे सुपुत्र आयआयटी मंडीच्या वित्त विभागाचे अधिष्ठाता डॉ. सत्त्वशील रमेश पवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जंगलात लागणारे वणवे अशा नैसर्गिक आपत्ती घडतात. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची धार्मिक ठिकाणेही जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आपत्तीविषयी सज्जता महत्त्वाची ठरते. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या विषयातील नावीन्यपूर्ण योजना तसेच प्रकल्प राबविण्यामध्ये अग्रेसर आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील पूरस्थितीमध्ये आपत्ती प्रवणता कमी करण्यासाठी, जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचा पथदर्शी प्रकल्प, जागतिक बँकेच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविला जाणारा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प यासाठीही हा करार उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.