उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला जाग

कुंभोज ( विनोद शिंगे)
टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली सुरू केल्या. एबी नाईन मराठी वर बातमी प्रसिद्ध होताच काही तासातच वीज वितरण ॲक्शन मोडवर आले आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास टोप ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील यांनी वीज वितरण विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर शिरोली औद्योगिक वसाहती मधील वीज वितरणचे अभियंता अविनाश चौगले हे यांनी घटनास्थळी आले. त्यांनी विजेचे खांब हलविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला आणखीण अपघात होऊ नयेत यासाठी काळजी घेण्यात आली. यामध्ये विजेच्या खांबांभोवती लोखंडी बॅरेल उभे करण्यात आले. तसेच त्याच्याभोवतीने तार गुंडाळण्यात आली. आणि धोकादायक सूचना देत विजेच्या खांबाच्या पश्चिमेकडील बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. विद्युत वाहिन्या हलविणे आणि विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनी ठेकेदारामार्फतच काम करत असल्याने याबाबतच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे अविनाश चौगले यांनी सांगितले.

मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार :तानाजी पाटील
दरम्यान उत्कर्ष पाटीलच्या मृत्यू कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी आणि संबंधित रस्त्याचे काम पूर्ण करणारा ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे टोपचे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.