लातूर ( प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसुद अभ्यासपुर्ण मांडतात .मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरीकांनी ऊपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देवून शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प राज्यातील जनतेच्या माथी मारला जात असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी लातूर येथे झालेल्या मराठवाडा शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात केली.


राज्यातील अनेक योजनांच्या निधीला कपात लावण्यात आली आहे. हजारो कोटीची कामे पुर्ण झालेली असूनही गेल्या सहा महिन्यापासून ठेकेदार बिलासाठी मोर्चे काढत आहेत. विविध शालेय शिष्युवृत्त्या , वेगवेगळे योजनांची अनुदाने रखडली आहेत राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे तरीसुध्दा राज्य सरकार शक्तीपीठ सारख्या अघोरी प्रकल्पांना मंजूरी देवून ८६ हजार कोटी रूपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे.
राज्यातील कोणत्याही व्यक्तीने , शेतक-याने किंवा भाविकाने शक्तीपीठ महामार्गाची मागणी केली नाही. सध्या रत्नागिरी -नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने तो तोट्यात चाललेला आहे. दैनंदिन सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर किमान ४० लाख रूपये टोलची वसुली होणे अपेक्षित असताना सध्या फक्त ११ लाख रूपयाची टोल वसुली होत आहे. जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पुन्हा वाहतूक विभागल्याने प्रकल्पाचा खर्च वसूल होण्यासाठी किमान १०० वर्षे टोलवसुलीचे भुत राज्यातील जनतेच्या मानगुटीवर बसणार आहे.