कोल्हापूरः आजची युवा पीढी सोशल मीडियाच्या विळख्यात सापडत चालली आहे. यातून या पीढीला बाहेर पडायचे असेल तर मोबाईलचा वापर कमी करत मित्र-मंडळी व परिवारांशी संवाद वाढवला पाहिजे. तसेच वाचन, लेखन, मैदानी खेळ याकडे अधिक भर देण्याची नितांत गरज आहे. हाच तणावमुक्तीचा खरा मार्ग आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील समुपदेशक उर्मिला शुभंकर यांनी केले.


शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने शुक्रवारी ‘नाती, भावना आणि करिअरचे संतुलनः हाच यशाचा महामार्ग’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून ‘स्मार्टफोन व्यसनमापन चाचणी’ व ‘भावनिक परिपक्वता मापन चाचणी’ सोडवून घेतली. शुभंकर यांनी करिअरच्या नव्या वाटा शोधताना नात्यांचा समतोल ऱाखणे, भावनिक क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे
सांगितले. हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना परस्पर सहकार्याचे कौशल्य वाढविणे व पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन हर्षवर्धन रजपूत यांनी केले. आभार डॉ. संतोष कोळेकर यांनी मानले. यावेळी डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. प्रकाश मुंज, प्रा. अनिल मकर, डॉ. अक्षय भोसले, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. प्रकाश निकम, डॉ.
गीता दोडमणी, डॉ. जयसिंग कांबळे यांच्यासह हिन्दी व इंग्रजी विभागाचे विद्यार्थी, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
