भारताची आर्थिक प्रगती संचलित करणारी भारतीय रिझर्व्ह बँक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 90वा वर्धापन दिन समारोप कार्यक्रम’ एनसीपीए, मुंबई येथे संपन्न झाला. या विशेष प्रसंगी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अविस्मरणीय प्रवासाचे प्रतीक म्हणून एका विशेष कस्टमाईज्ड ‘माय स्टॅम्प’चे प्रकाशन केले.

 

 

मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीला बँकिंग प्रणालीने दिलेली गती इतर कोणत्याही प्रणालीपेक्षा विशेष उल्लेखनीय राहिली आहे. आर्थिक उलाढाली संचलित आणि नियमित करण्यासाठी तसेच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना, मोहिमांना नवे पंख देऊन नव-नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठी भूमिका बजावली आहे. यालाच संचलित आणि नियमित करण्यासाठी 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. ही बँकांची बँक आज एक वटवृक्ष म्हणून संपूर्ण राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला एक छत्रछाया प्रदान करत आहे.

आज भारतीय रिझर्व्ह बँकेची गणना जगातील अग्रगण्य मध्यवर्ती बँकांमध्ये केली जाते, हे प्रत्येक भारतीयासाठी भूषणास्पद आहे. याप्रसंगी माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 वर्षांच्या असाधारण प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!

यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.