कसबा आरळे येथील कामाबाई मंदिरात पंचांग वाचन

म्हालसवडे /प्रतिनिधी
गुढीपाडव्या दिवशी श्री शालिवाहन शकाची १९४६ वर्षे संपून १९४७ वे वर्ष सुरू झाले असून पंचांगानुसार या वर्षाचे नाव विश्वावसू आहे. २२ जूनला सूर्य आद्रा नक्षत्रात जात आहे. त्याचे फल महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भागात धान्य कमी पिकून टंचाई भासेल. पाण्याची कमतरता भासून चोरांपासून त्रास होईल. अशी माहिती पंचांग वाचन करताना पांडुरंग पाटील यांनी दिली.

 

 

गुढीपाडव्या निमित्त करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील ग्रामदैवत कामाबाई मंदिरात पंचांग वाचन करण्यात आले. पंचांगात सांगण्यात आले की, येत्या वर्षभरात दोन चंद्रग्रहणे व दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. मात्र यातील सूर्यग्रहणे भारतात दिसणार नाहीत. या वर्षी २५ मे पासून सुरु होणाऱ्या रोहिणी नक्षत्रात उष्णता वाढेल, पावसाची एखादी सर पडेल, क्वचित गारा पडतील व वातावरण ढगाळ राहील.

जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस माघारी जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या वर्षी पंचांगानुसार पाऊस वाण्याचे घरी असून समाधानकारक होणार आहे. मात्र पिकांचे मान ६५ टक्के वर जाईल, वैरणीची स्थिती बरी राहील. फळे व पालेभाज्यांची स्थिती चांगली राहील असे सांगितले आहे.

यावेळी पुढील वर्षभरात कसबा आरळे गावात होणारा भंडारा उत्सव, ज्ञानेश्वरी पारायण, म्हाई व गावलाट या शिवाय विविध धार्मिक कार्यां विषयी चर्चा झाली. येथे पाटलांची भावकी मोठी असल्याने सुतकाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भावकींचे विभाजन करून खूत फोड करण्यात आली. असे आणखी विशेष निर्णय यावेळी घेण्यात आले. ग्रामदैवत कामाबाई देवीची महाआरती करण्यात आली. गुढीपाडव्या निमित्त ग्रामस्थांनी एकत्रित कडुलिंब खाऊन कार्यक्रमाची सांगता केली. या वेळी युवराज भोगम, भिकाजी जाधव, धनाजी पाटील, साताप्पा सुतार, बाजीराव पाटील, विष्णू जाधव, पुजारी प्रकाश गुरव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545