कोल्हापूर: येथील राजाराम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्राच्या दिवंगत प्राध्यापिका डॉ. शोभना जाधव यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी त्यांचे पती अशोक जाधव यांनी आज शिवाजी विद्यापीठास ११ लाख रुपयांची देणगी दिली.
अशोक जाधव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदवी स्तरावर सर्वोत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावणाऱ्या दोन विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी यांना शोभना जाधव यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरूंच्या हस्ते श्री. जाधव यांचा ग्रंथ, शाल आणि विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सौ. दुर्गाली गायकवाड, भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे, एस. पी. वेलचे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील, राजेश गायकवाड, उदय टिकेकर, तेजराज पाटील उपस्थित होते.