कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2024-25 चे सुधारीत व सन 2025-26 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 95 मधील तरतुदींनुसार सादर करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपल्याने प्रशासक, कोमनपा या नात्याने आपले बजेट 2025-26 या संकल्पनेवरील अंदाजपत्रक नागरिकांसाठी सादर करण्यात येत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2025 26 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह मनपा व पाणीपुरवठा महसूली अपेक्षित जमा रक्कम रुपये 707.64 कोटी असून खर्च रुपये 707.48 कोटी अपेक्षित आहे. तसेच मनपा,पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 224.94 कोटी असून खर्च रुपये 224.77 कोटी आहे. व विशेष प्रकल्पा अंतर्गत जमा रुपये 360.22 कोटी अपेक्षित असून खर्च रुपये 359.72 कोटी आहे. केंद्रीय वित्त आयोगाचे स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा रु. 41.95 कोटी अपेक्षित असून खर्च रु. 41.95 कोटी अपेक्षित आहे. याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण रु 1334.76 कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजसादर करण्यात येत आहे.
सन 2025-26 चे आपले बजेट तयार करताना शहरातील नागरिकांकडून थेट अपेक्षा सूचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही नागरिकांनी आपल्या सूचना,अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आगामी बजेट तयार करताना या सर्व अपेक्षा, सूचनांचा विचार करणेत आला आहे.
सन 2025-26 चे नवीन अर्थसंकल्पामधील प्रमुख उद्दीष्टे –
- नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करुन जास्तीत जास्त उपयुक्त योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश.
- नवीन वर्षामध्ये घरफाळा, पाणी पुरवठा शुल्क यामध्ये कोणतीही कर वाढ नाही. कांही सेवा शुल्कांमध्ये अल्पशी सुधारणा.
- मनपा महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर व खर्चामध्ये वित्तीय शिस्त.
- भांडवली कामाअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन.
- कामाचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष.
- आरोग्य व स्वच्छता, शिक्षण कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी.
- महिला, दिव्यांग कल्याणकारी योजनांवर भर.
- ऑनलाईन सेवा सुविधा पुरविण्यावर भर.
- परिवहन सेवा सक्षमीकरण.
सन 2024-25 चे सुरु असलेल्या अर्थसंकल्पामधील अंमलबजावणी –
सन 2024-25 च्या मंजूर अर्थसंकल्पाचा आढावा घेतला असता पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात आल्या आहेत.
- घरफाळा, पाणी पुरवठा व परवाना शुल्कमध्ये सवलत योजना – शहरातील मिळकत धारकांसाठी प्रलंबित घरफाळा थकबाकी एक रक्कम भरणा करणेसाठी घरफाळा दंडामध्ये सवलत योजना राबविण्यात आली आहे. तसेच पाणीपट्टी शुल्क परवाना शुल्कमध्येही पुढील प्रमाणे सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. दि.15 जाने. ते 28 फेब्रु.2025 या कालावधीमध्ये थकीत संपूर्ण रक्कम भरलेस विलंब शुल्कामध्ये 80 टक्के सवलत व दि.1 मार्च ते 31 मार्च 2025 मध्ये विलंब शुल्कमध्ये 50 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे घरफाळा, पाणीपट्टी व परवाना शुल्कची थकीत रक्कम वसुल होऊन उत्पन्न वाढ झालेली आहे, नागरिकांनाही या योजनेचा लाभ झालेला आहे.
- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधी (N-Cap) अंतर्गत योजनांची अंमलबजावणी – कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजना ही 2019 सालापासून सुरु झालेले असून सदर योजनेमध्ये आत्तापर्यंत रु. 24.11 कोटी निधी प्राप्त आहे. याअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षामध्ये हवेतील धुलीकण कमी होण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत.