कोल्हापूर:राज्य कुस्तीगिर संघटनेच्यावतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत, पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्याकडून पृथ्वीराज मोहोळला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे विश्वराज महाडिक यांनी यावेळी सांगितले.
मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ या मल्लाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. या कामगिरीनंतर पृथ्वीराजने भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांची आज कोल्हापुरात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याबद्दल विश्वराज महाडिक यांनी पृथ्वीराज मोहोळ यांचे अभिनंदन केले आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या तर्फे एक लाख रुपयांचे बक्षिसही दिले. यावेळी कुस्ती क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. पुढीलवर्षी मोहोळमध्ये होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन भिमा उद्योग समुहामार्फत करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य कुस्तीगीर संघटनेला पाठवल्याचं विश्वराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय कांस्य पदक विजेता पुण्याचा अनिकेत सोनवणे, पवन लोणकर, विराज मोहोळ, सरदार पाटील, युवराज माळी, शामराव पाटील यांच्यासह मल्ल उपस्थित होते.