गोकुळचा सौर ऊर्जा प्रकल्प पर्यावरण संरक्षणासह स्वच्छ ऊर्जा अभियानाचे आदर्शवत मॉडेल ठरेल – नामदार हसन मुश्रीफ

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने १६ मार्च संघाच्या ६२ वर्धापनदिनाचे औचित्य साधून  सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे खरेदी केलेल्या १८ एकर जागेमधील ६.५ मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व करमाळ्याचे आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या व सर्व संचालक मंडळ, मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी, दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी यांच्‍या उपस्थितीत लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

 

   यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ मार्फत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला असून या प्रकल्पामुळे गोकुळची बिलामध्ये अंदाजे ६ कोटी रुपये बचत होणार आहे. गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला ६.५ मेगा वॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे. हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळ सारख्या एका सहकारी संस्थेने केले आहे. हा सहकारातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमुलं पेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. भविष्यात ऊर्जा निर्मितीसाठी सौर प्रकल्प सक्षम ठरणार असून गोकुळचा चार मेगा वॅटचा विस्तारीकरण करण्याचा मानस आहे अश्या पर्यावरण पूरक विजनिर्मितीला चालना देण्याची गरज असून असे उपक्रम विविध सहकारी संस्थांनी राबववे असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.

          यावेळी बोलताना करमाळाचे आमदार नारायण (आबा) पाटील  पाटील म्हणाले कि, गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळने आपल्या गुणवत्तेचा जोरावर पुणे,मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.गोकुळसारख्या मोठ्या संस्थेने आमच्या लिंबेवाडी करमाळा येथे प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी त्यांना नेहमीच आमचे सहकार्य राहील असे मनोगत व्यक्त केले.

          यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च १६ कोटी इतका येतो. हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरविले त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यामध्ये २०० एकरवर पुणे येथील सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहेत यापैकी गोकुळने १८ एकर जागा खरेदी करून या जागेमध्ये ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून यामुळे एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचतच होणार आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका आला असून या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६ कोटी इतकी बचत होणार आहे. सदर  प्रकल्प पूर्ण झाला असून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

          यावेळी स्‍वागत संचालक अभिजित तायशेटे व प्रास्ताविक संचालक अजित नरके यांनी केले. तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती मे.सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी दिली व आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी गोकुळ दुध संघ व मे. सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. पुणे. यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रकल्पाची वैशिष्टे –

* प्रकल्प क्षमता – ६.५ मेगा वॅट

* प्रकल्प किंमत – रु. ३३.३३ कोटी

* प्रकल्पासाठी लागलेली जमीन अंदाजे १८ एकर

* गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगांव येथील वार्षिक वीज वापर १ कोटी ५८ लाख युनिट

* गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगांव येथील येणारे वार्षिक वीज बिल रु. १६ कोटी

* सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वार्षिक वीज अंदाजे १ कोटी २ लाख युनिट

* सोलर प्रकल्पामुळे होणारी वार्षिक बचत अंदाजे रु. ६ कोटी.

* प्लांट उभारणी केलेल्या कंपनीचे नांव मे. सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. पुणे.

* एकूण सोलर पॅनेल्स ११९२८, ‘वारी’ कंपनीचे, प्रती पॅनेल्स क्षमता – ५४५ वॅट

* एकूण इनव्हर्टर्स – १६, सनग्रो कंपनीचे, प्रती इन्र्व्हटर क्षमता – २९५ KW

          सदर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे ८,००० मेट्रीक टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन टाळले जाईल. प्रकल्पाच्या २५ वर्षाच्या कालावधीत एकूण २ लाख मेट्रीक टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन वाचवता येईल, जे अंदाजे १० लाख झाडे लावण्याइतकी हरित हवा निर्माण करेल. गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला ६.५ मेगा वॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे.

          या कार्यक्रम प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ, सहा.व्यवस्थापक इलेक्ट्रिकल अनिल स्वामी, तसेच मे.सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी जयगोविंद त्रिपाठी,मनोज शहा,राजेश बांदल,नगराध्यक्ष कर्जत नामदेव राऊत  व संघाचे अधिकारी तसेच करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते.