कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, स्थानिक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून या मार्गाच्या कामासंबंधी हालचाली वाढल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनापूर्वीच आज सकाळीच पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. तसंच शेतकरी संघटनेच्या इतर काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
स्थानिक शेतकरी आणि विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचा या महामार्गाला विरोध असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र या शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही आहेत. शक्तीपीठ मार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत 12 जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भआणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे, असं नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.