कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिविभाग, पर्यावरण शास्त्र अधिविभाग, सेन्टर ऑफ क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी व इंडियन सोसायटी ऑफ हौसिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स, ISHRAE- इशरे कोल्हापूर चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय “ सृष्टी संजीवन ” राष्ट्रीय पर्यावरण परिषदेची काल (दि. ७) यशस्वी सांगता झाली.

कोल्हापूर व सांगली जिल्हा तसेच अन्य परिसरामध्ये पर्यावरणाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, धूलिकण, पूर , पावसाचे घटते प्रमाण अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जाण्यासाठीचे उपाय व निसर्गाशी सुसंगत राहण्यासाठी अक्षय ऊर्जा संसाधनांचा वापर याबद्दल परिषदेत सर्वंकष चर्चा झाली.
या परिषदेत राष्ट्रीय स्तरावरून एकूण १३० हून अधिक शोधनिबंधांचे सादरीकरण झाले. संशोधकांनी पोस्टर प्रेसेंटेशनही केले.
सांगता समारंभास आय.एस.टी. ई. चे चेअरमन प्रतापसिंह देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी भारतीय तसेच जागतिक शिक्षण प्रणालीचा आढावा घेतला. भारतामध्ये दरवर्षी १७ लाख अभियंते तयार होतात. तथापि प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता बाळगणारे अभियंते तुलनेने कमी असतात. जगप्रसिद्ध अनेक कंपन्यांमध्ये ३० टक्के भारतीय अभियंते आहेत. या कंपन्यांचे सी.ई.ओ. भारतीय आहेत. याचा अर्थ आपल्यामध्ये ती क्षमता आहे. ज्ञान निर्मिती केली तरच इनोव्हेशन होईल. त्यामधून टेक्नॉलॉजी निर्माण होईल. त्यामधून पैशाची निर्मिती होईल. या पैशांमधून सामान्य माणसांना अनेक सुविधा देता येतील. तरच हा परीघ पूर्ण होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी शिक्षक हेच अपेक्षित बदल विद्यार्थ्यामार्फत करू शकतात, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा सागर डेळेकर यांनी परिषदेच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. शिवाजी विद्यापीठ राबवत असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आढावा त्यांनी घेतला.
तंत्रज्ञान अधिविभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. उत्तम बोंबले यांनी केली करून दिली. निमंत्रक डॉ. पुनश्री फडणीस यांनी आभार मानले. इशरे कोल्हापूर चाप्टरचे अध्यक्ष प्रमोद पुंगावकर व त्यांचे सहकारी, सह निमंत्रक एस. बी. काळे, सागर पोर्लेकर, महेश साळुंखे, श्रीकांत भोसले, विविध शाखांचे समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.