राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके

कोल्हापूर: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील अॅमिटी विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाने दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.

 

 

राष्ट्रीय युवा महोत्सव 2024-2025 अॅमिटी विद्यापीठ, नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दि. ३ ते ७ मार्च या कालावधीत झाला. सदर महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठाचा एकूण 20 जणांचा संघ सहभागी झाला. सदर युवा महोत्सवामध्ये शास्त्रीय गायन आणि एकांकिका या दोन्ही कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली कला सिद्ध केली. अर्णव मच्छिंद्र बुवा याने शास्त्रीय गायनात तर शंतनू पाटील दिग्दर्शित “बादलों की छाव में” या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.

सदर संघाला कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के,  प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. प्रमोद पाटील, विश्वासराव नाईक कॉमर्स, आर्टस् व बाबा नाईक सायन्स महाविद्यालय, शिराळा यांनी काम पाहिले. संघास सहाय्यक अधीक्षक सुरेखा आडके यांचे व विद्यार्थी विकास विभागाचे सहकार्य लाभले.