कोल्हापूर: कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्रश्नी चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करु, तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करु अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळाला दिली.
कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, केंद्रीय प्रदूषण मंडळाची मूर्ती विसर्जनावर नवी गाईड लाईन नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय नाही.
सदर पर्याय मिळेपर्यंत पी.ओ.पी.वापरास शासनाने परवानगी द्यावी, याबाबत शासन स्तरावर बैठक आयोजित करणेबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने माझी मुंबई येथील मित्रा संस्थेच्या कार्यालयात भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मूर्ती घडविणाऱ्या कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही. याबाबात सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करू. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेवून प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळामध्ये महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, सचिव प्रवीण बावधनकर, खजानीस हेमंत जोशी, कोल्हापूर मूर्तिकार संघटना अध्यक्ष प्रमोद कुंभार, खजानीस अनिल निगवेकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र माजगावकर, सागर वडणगेकर, किरण माजगावकर, प्रशांत देसाई आदी उपस्थित होते.