कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता, शासनाच्या आदेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात जमा करावे, अशा सूचना आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांनी दिल्या. तसेच, दोन महिन्यांपासून उत्पन्न दाखले न देणाऱ्या पाचही गावातील तलाठ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अप्पर तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक झाली. यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, संगणक समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, सदस्य कोंडीबा दवडते, महेश पाटील, सुखदेव माळकरी, संजय नागुरे, महेश ठोके, सलीम मुजावर, भगत, माजी नगरसेवक संजय केंगार तसेच पाच गावांचे तलाठी, सर्कल अधिकारी आणि संगणक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी समितीच्या सदस्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. दोन महिन्यांपासून उत्पन्न दाखले न मिळाल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी तलाठ्यांना तत्काळ उत्पन्न दाखले देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
डीबीटी प्रक्रियेत अडथळे
शासनाने थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इचलकरंजीतील सुमारे 6,000 लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना डीबीटीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे, “सर्वांनी मिळून टीम वर्कच्या माध्यमातून ही खाती आधारशी लिंक करून द्या, जेणेकरून सर्वांना लाभ मिळेल,” असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले.
लाभार्थ्यांना हवी त्या बँकेत खाते उघडण्याचा अधिकार असावा
शासनाने लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार हवी त्या बँकेत अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इचलकरंजी कार्यालयातून केवळ केडीसीसी बँकेतच खाते उघडण्याचा आग्रह केला जात असल्याने आमदार आवाडे यांनी नाराजी व्यक्त केली.
“केडीसीसी बँकेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लाभार्थ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अनेकजण पहाटेपासूनच रांगेत बसतात. त्यात मोठ्या संख्येने लाभार्थी वयोवृद्ध असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेत खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध करावा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या या बैठकीमुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याच्या प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना विनाअडथळा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.