पुणे : राज्यात आरोग्य विभागाच्या वतीनं ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ मोहीम स्वरुपात राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध येथे ‘राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांच्यासह हस्ते संपन्न झाला.
कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बालकांचे आरोग्य निरोगी राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग त्या दिशेने काम करत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे नाम.अजितदादा यांनी सांगितले.
बालकांचे आरोग्य निरोगी राखण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. आरोग्य विभाग आपली जबाबदारी निश्चित पार पाडेल. राज्याचे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सर्व विभागांना दिला असून आरोग्य विभागही आपली जबाबदारी पार पाडेल आणि बालकांचे तसेच महिलांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त केला.
पुण्यातील ९ शाळांमधील 2 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच वेळी राज्यातील तालुका स्तरावरील ३५५ शाळा आणि जिल्हा स्तरावरील ३५ शाळांमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी, उपचार, संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग,नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम राबविण्यात येणार आहे.
तपासणी मध्ये आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा जसे की, औषधोपचार, शस्त्रक्रिया देवून उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे या सेवा पुरविण्यात येणार आहेत.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री नाम.दादाजी भुसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ.बबिता कमलापूरकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे, डॉ.आर बी. पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.