देशभरातल्या लोकवाद्यांनी निनादले शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात आज (दि. २४) दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर विविध लोकवाद्यांच्या सूरतालांनी निनादला. ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत केवळ ध्वनीफीती अथवा चित्रपटांमधूनच कानी पडतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी यामुळे नागरिकांना लाभली. या लोकवाद्य वादन कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली आणि त्याचा आनंद लुटला.

 

 

गतवर्षी भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशभरातील लोकवाद्यांचे वादन आणि प्रदर्शन शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्याचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा मानस होता. त्यांच्याच संकल्पनेतून गतवर्षीपासून या लोकवाद्य महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी ७.३० ते ९.३० वा. या कालावधीत हा लोकवाद्य वादन महोत्सव साजरा झाला. या उपक्रमांतर्गत देशाच्या चार दिशांकडील राज्यांतील वाद्ये विद्यापीठ परिसराच्या चार दिशांना वाजविण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात सकाळी साडेसात वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी हलगी वाजवून या उपक्रमाचे सांगितिक उद्घाटन केले. त्याखेरीज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील परिसर, संगीत व नाट्यशास्त्र विभागाशेजारील तलाव आणि क्रांतीवन या ठिकाणीही विविध वाद्यांचे वादन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी संयोजन समितीच्या सदस्यांसह सदर सादरीकरणांचा आस्वाद घेतला आणि वादक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व लोकवाद्यांचे सायंकाळी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्रदर्शनही मांडण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक वाद्याची माहिती देण्यात आली. ऋषीकेश देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, कौस्तुभ शिंदे, अभय हावळ, अनिकेत देशपांडे, प्रेम भोसले, ओम शिंदे, सुमंत कुलकर्णी, मयुरेश शिखरे, तेजस गोविलकर, सौरभ आदमाने यांनी या विविध वाद्यांचे सादरीकरण केले. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवातील मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात शिक्षक, प्रशासकीय सेवक यांचाही सांस्कृतिक कार्यक्रम राजर्षी शाहू सभागृहात रंगला.

भारतीय संगीत परंपरेच्या परिचय व संवर्धनासाठी उपक्रम

शिवाजी विद्यापीठाने देशाच्या विविध प्रांतात, राज्यांत वाजविल्या जाणाऱ्या लोकवाद्यांचा महोत्सव आयोजित करून त्यांचे वादन आणि प्रदर्शन या माध्यमातून भारतीय संगीत परंपरेचा आपल्या विद्यार्थी व नागरिकांना परिचय व संवर्धन करण्यासाठी गतवर्षीपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे, ही बाब उत्साहवर्धक असल्याचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, समन्वयक डॉ. नितीन कांबळे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.टी. कोंबडे आदींसह संगीतरसित मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.

या लोकवाद्यांचे झाले वादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकवाद्य वादन व प्रदर्शनात पुढील वाद्यांचा समावेश राहिला. ढोलकी, ढोल, दिमडी, चौंडके, हलगी, संबळ, घुमके, थविल, चेंडा, इडक्का, कोट्टू, मुरासू, थमारू, पंबई ईसाई, उरुमी, उडुक्काई, मोडा, पराई, पंजाबी ढोल, चिमटा, टोका, कैची, दद्द, बुगचू, तुंबी, ढोलक, भपंग, खोळ, मोंडल, एकतारी, खमख, बिहू ढोल, तिबेटियन गाँग, बडुंगदुप्पा, पेपा, गोंगना ही देशाच्या विविध प्रांतात वाजविली जाणारी वाद्ये वाजविण्यात आली.

 महोत्सवात उद्या…

उद्या, मंगळवारी (दि. २५) शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा अखेरचा दिवस असून राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य, समूह नृत्य स्पर्धा होतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होईल.