कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात इन्फोसिस कंपनीच्या वतीने आयोजित कॅम्पस पुल ड्राइव्हअंतर्गत ९४२ विद्यार्थिनींच्या ऑनलाईन चाचणीचा टप्पा आज यशस्वीरित्या पार पडला. यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक विद्यार्थिनींची उद्या (दि. १९) मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे.
इन्फोसिसच्या आजच्या या कॅम्पस निवडीमध्ये विद्यार्थिनींना शंभर टक्के स्थान देण्यात आले असून अशा प्रकारे एकाच कंपनीसाठी केवळ विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला शिवाजी विद्यापीठातील हा पहिला आणि सर्वात मोठा कॅम्पस ड्राइव्ह ठरला.
इन्फोसिस पुल कॅम्पस ड्राइव्हसाठी सुमारे २२०० विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. त्यामधील १३०४ विद्यार्थिनींची ऑनलाईन चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. त्यातील ९४२ जणींनी आज ऑनलाईन चाचणी दिली. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसह गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र विषयांत एम.एस्सी. आणि एमसीए झालेल्या विद्यार्थिनींचा समावेश राहिला. आज दोन बॅचेसमध्ये या विद्यार्थिनींची ऑनलाईन चाचणी घेण्यात येतील. तंत्रज्ञान अधिविभाग, संख्याशास्त्र अधिविभाग आणि आय.जी.टी.आर. कक्ष (भूगोल अधिविभाग) येथे चाचणी झाली. या चाचणी परीक्षेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थिनींच्या बुधवारी (दि. १९) प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन अंतिम उमेदवार निवडण्यात येतील.
चाचणी परीक्षेपूर्वी आज सकाळी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात इन्फोसिसच्या सिनिअर असोसिएट लीड (टीम अॅक्विझिशन) मेधा बहुखंडी यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी चाचणीपूर्व संवाद साधला आणि इन्फोसिस कंपनीविषयी माहिती दिली. कोविड-१९नंतरच्या कालखंडात इन्फोसिसच्या वतीने देशभरात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मोठा कॅम्पस पुल ड्राईव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इन्फोसिसच्या मैसूर येथील जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्रामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि तेथील त्यांच्या एकूण कार्यप्रदर्शनानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. इन्फोसिस लिंगसमभावामध्ये विश्वास ठेवणारी कंपनी असून कंपनीमधील स्त्री-पुरूष गुणोत्तर हे ५०:५० करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. विद्यार्थिनींच्या विविध शंकांचेही त्यांनी समाधान केले.
विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शामल पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इन्फोसिसचे सुमीत गोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. ए.बी. कोळेकर, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. गणेश पाटील, डॉ. रामचंद्र जाधव यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
आजचा कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम कार्यरत राहिली. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊसाहेब सभागृहापासून विद्यार्थिनींना तंत्रज्ञान अधिविभागातील चाचणी केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष आरामबसेसची सुविधाही पुरविण्यात आली.