कोल्हापूर: आपापल्या विज्ञान प्रकल्पाविषयी अत्यंत गांभीर्याने माहिती सांगणारे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तितक्याच गांभीर्याने त्याचे म्हणणे ऐकून घेणारे, त्याला प्रश्न विचारणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यात काही शिक्षकही सामील झालेले, असे एक अनोखे आणि विज्ञानाप्रती सजगता दर्शविणारे चित्र शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात पाहावयास मिळाले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठ, जिल्हा परिषद आणि पुण्याच्या लेंड अ हँड इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या अटल टिंकरिंग स्कूल्सच्या प्रकल्प सादरीकरण व प्रदर्शनाचे.
शिवाजी विद्यापीठात उद्या (दि. १४) पासून ‘विकसित भारत-२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावरील दोनदिवसीय ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज विद्यापीठासह जिल्हा परिषद आणि पुण्याच्या लेंड अ हँड इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमातून १३० अटल टिंकरिंग स्कूल्सकडून १८० प्रकल्पांचे आज सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ५४० अधिक विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले. या प्रकल्पातील निवडक प्रकल्पांचे उद्याच्या परिषदेमध्ये पुनश्च सादरीकरण होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक सृजनशीलतेचा परिचय देताना भारताचा भविष्यकाळ हा विज्ञानवादाच्या पायावरच उभा असेल, याची जणू उपस्थितांना ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये स्मार्ट शेतीपासून स्मार्ट गोठ्यापर्यंत आणि स्मार्ट शाळेपासून ते स्मार्ट घरापर्यंत प्रत्येक प्रकल्पाचा समावेश होता. शेतीविषयक विचार, एखाद्या उपकरणाचे, परिसर संरचनेचे डिझाईन, सुतारकाम, रोबोटिक्ससह इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल अभियांत्रिकीच्या पाऊलखुणा या विद्यार्थ्यांच्या कामामध्ये दिसून येत होत्या. काही अभिनव उपक्रमांनी तर विद्यापीठातल्या शिक्षकांसह अधिविभागातल्या आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचेही लक्ष वेधून घेतले. त्यामुळे एरव्ही मोठ्या ताई-दादांचे प्रकल्प कुतूहलाने पाहणाऱ्या छोट्यांना या निमित्ताने आपल्या प्रकल्पांची माहिती त्यांना देण्याची संधी मिळाली. आपला प्रकल्प कुतूहलाने पाहणाऱ्या, त्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या या ताई-दादांना हे शालेय विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे देताना दिसत होते.
प्रदर्शनस्थळी लक्षवेधी ‘स्कील ऑन व्हील्स’
यावेळी लेंड अ हँड इंडियाच्या वतीने ‘स्कील्स ऑन व्हील्स’ हे वाहन प्रदर्शनाच्या सुरवातीलाच उभे करण्यात आले होते. त्यामळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची पावले सर्वप्रथम याच वाहनाकडे वळत. सर्व प्रकारच्या कौशल्यांसाठी लागणारी बहुविध उपकरणे, औजारे यांची मांडणी आकर्षक पद्धतीने तिथे करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी यातील आपल्याला माहिती नसणाऱ्या उपकरणांविषयी जाणून घेण्यात रुची दर्शविली.
शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची प्रचिती: प्र-कुलगरू डॉ. पाटील
शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य संधी मिळाल्यास त्यांच्यातील सर्जनशीलतेची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही, हे आजच्या प्रदर्शनामधून सिद्ध झाले आहे, असे गौरवोद्गार विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सायंकाळी प्रदर्शनाच्या पारितेषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन काढले. ते म्हणाले, अटल टिंकरिंग लॅब ही आपल्या वैज्ञानिक सर्जनशीलतेची पहिली पायरी आहे. येथून पुढेही आपल्याला विज्ञान क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे. आजच्या नवसंकल्पनांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले, त्यामधून एक तरी पेटंट प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, लेंड अ हँड इंडियाचे चेअरमन मिलींद माने यांनीही मनोगत व्यक्त केले. अरुंधती जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण करण्यात आले.