शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात येत्या १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील एन.एस.एस. स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली आहे.

 

 

 

 

पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर विविध राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना एकत्र आणून त्यांच्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक आदान-प्रदान वृद्धिंगत करण्याचा उद्देश त्यामागे आहे.

येत्या रविवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजता या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात येणार असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी असतील. प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालक (पुणे) अजय शिंदे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल.

या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गोवा या १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतून २१० स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि २१ संघ व्यवस्थापक असे एकूण २३१ जण सहभागी होणार आहेत.

२२ फेब्रुवारीपर्यंत आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरामध्ये योगासनांसह विविध शैक्षणिक विषयांवरील उद्बोधक सत्र, गटचर्चा, शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा, कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, लेझीम व झांज पथक, शिववंदना, मर्दानी खेळ, रस्सीखेच स्पर्धा, वैयक्तिक देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, एक दिवसीय श्रमदान आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांना स्पर्श करणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शनिवारी (दि. २२) शिबिराचा समारोप समारंभ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्वयंसेवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.