जागतिक मनोरंजन परिषद ‘वेव्ज 2025’ मुंबईत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्ज 2025) बाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या या जागतिक परिषदेचे आयोजन केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री यांनी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आणि राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला, सृजनशीलता आणि प्रतिभा दाखविण्याची ही सुवर्णसंधी असून, महाराष्ट्रासाठी हे एक अभिमानास्पद पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांचे महत्त्वाचे निर्देश
✅राज्य शासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून समन्वयासाठी एक अधिकारी नेमला जाईल.
✅राज्य शासनाच्या सहकार्याने परिषदेसाठी आवश्यक यंत्रणा उभारली जाईल.
✅महाराष्ट्राचे कला विश्व जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी परिषदेतील प्रदर्शनात विशेष दालनाची व्यवस्था केली जाईल.
✅जगभरातून येणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ व कलाकारांचे महाराष्ट्र जंगी स्वागत करेल.

केंद्रीय सचिव जाजू यांनी यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करून माहिती दिली. दावोस येथील जागतिक अर्थ परिषदेच्या धर्तीवर भारतातील मनोरंजन क्षेत्राच्या संधींना चालना देण्यासाठी ‘वेव्ज 2025’ महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

बैठकीस मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिका आयुक्त व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.