कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराचा आढावा घेणेसाठी शासकीय विश्रामगृह येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी साथरोग नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी एसओपी तयार करून त्याची जिल्हाभर जबाबदारी निश्चित करावी अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
शिवनाकवाडी येथील विषबाधा झालेल्या रूग्णांबद्दलची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व रूग्ण पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांना आवश्यक ते उपचार द्यावेत. त्याचबरेबर साथरोग नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून त्यांनी या कामात कुचराईपणा करू नये अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर नागरिकांनीही पिण्याचे पाणी उकळून पिणे, स्वयंपाकाची जागेत स्वच्छता राखणे, उघड्यावरील पदार्थ न खाणे अशा सूचना दिल्या.
शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून झालेल्या विषबाधेसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य, ग्रामविकास आणि महसूल विभागाने एकत्रीतरित्या काम करावे. अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्याबाबतच्या आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) तयार करून त्याची जिल्हाभर अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
सातशे रूग्णांपैकी साडेसहाशे रूग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ४७ जणांवर उपचार सुरू असून त्यांची तब्येत चांगलीच सुधारली आहे. येथून पुढे अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगितले.
या बैठकीस प्रांताधिकारी श्री.चौगले, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द पिंपळे, शिरोळचे तहसिलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी, अन्न औषध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिवनाकवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.