निरोगी महाराष्ट्रा’साठी माता-भगिनींचे आरोग्य जपणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे – राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ‘निरोगी महाराष्ट्र’ बनविण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील माता-भगिनींचे आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

 

उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लोकोपयोगी आरोग्य सेवा उपक्रमांचे लोकार्पण व राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणीचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली या लोकार्पण सोहळा आणि महिला तपासणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्य मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अभिनेता गोविंदा, नविन सोना, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.स्थानिक लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या ‘#हर_घर_आयुर्वेद’ या प्रकल्पाचा शुभारंभ प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्य मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार, यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी मायका या मोबाईल ॲपचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर्स, दंतशल्यचिकित्सक, अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य निरोगी असावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” शासनामध्ये काम करणारे प्रत्येक अधिकाऱ्याने प्रमाणे नागरिकांनी सुद्धा संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. संकटाच्या काळात रुग्णांना वेळेवर तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेल्या आरोग्य सेवा उपक्रमांचा राज्यातील रुग्णांना खासकरून दुर्गम भागातील रुग्णांना निश्चित फायदा होईल. सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदारी सांभाळताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक सेवा आणि उपाय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. माता-भगिनींचे आरोग्य जपले तरच महाराष्ट्र निरोगी होईल.”

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, महिलांवर विविध जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य कडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच आरोग्य विभागाने राज्यातील महिलांचे आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळील परिसरामध्ये वेलनेस सेंटर तसेच राष्ट्रीय हर्बल गार्डन प्रकल्प उभारणार असल्याचे यावेळी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्यामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ७ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन मशीन, ८० डिजिटल हँड हेल्ड एक्स-रे मशीनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी उपक्रमांतर्गत रक्त तपासणी – हिमोग्लोबिन सर्व प्रकारच्या तपासण्या, मधुमेह, रक्तदाब, गरजेनुसार ईसीजी तपासणी, सर्वसाधारण तपासणी, निदान व उपचार करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक अमगोधू श्री रंगा नायक यांनी केले.