पुणे : कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025 -26 प्रारूप आराखडा बाबत राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री नाम.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये सन 2024-25 चे 100% नीधी वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार अपारंपारिक ऊर्जा योजनेमधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांना सोलरवर टप्पाटप्प्याने रूपांतर करण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याबाबत व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच मधाचे गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचे उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीस चालना देण्याबाबत वित्तमंत्री यांनी सूचना दिल्या.
गंगावेश तालीम, रंकाळा तलावातील सांडपाणी बाबत नियोजन, मिशन शाळा कवच, समृद्ध विद्या मंदिर अंतर्गत कामाकरता जास्तीत-जास्त लोकसहभाग, सीएसआर फंड यामधून विकास करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि पन्हाळा किल्ला जागतिक वारसासाठी करण्यात येणाऱ्या कामाकरता राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा अशा सूचना वित्तमंत्री यांनी दिल्या.
या बैठकीसाठी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री नाम.माधुरीताई मिसाळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ,आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कार्तिकेअन, महापालिका आयुक्त श्रीमती के.मंजूलक्ष्मी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.